पारध परिसरात गहू, हरभरा मळणीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:40+5:302021-03-07T04:27:40+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात दोन आठवड्यापूर्वी बहुतांश ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला होता. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे ...
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात दोन आठवड्यापूर्वी बहुतांश ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला होता. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातच काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने शेतकरी गहू व हरभरा ही पिके मळणीयंत्रातून काढण्यासाठी धडपड करीत आहे.
सध्या हार्वेस्टरद्वारे गहू काढणीचे दर एकरी दोन हजार रुपये आहे तर हरभरा सोंगणीची मजुरी देखील एकरी दोन हजार रुपये आहे. खरिपातील झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार असल्याने शेतकरी संतुष्ट झाले आहे. कधी बदलते हवामान, अल्प पर्जन्यमान, तर कधी अतिवृष्टी या नैसर्गिक संकटांमुळे मागील काळात खरिपासह रब्बीची पिके वाया गेली आहे. यंदा मात्र, निसर्ग मेहरबान असल्याने पारध परिसरातील धामना आणि पद्मावती धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी उपलब्ध रब्बीचा पेरा पूर्ण केला आहे. परिसरात हजारो हेक्टरवर रब्बीची पिके बहरली होती. परंतु, मागील महिन्यात तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. गारपिटीतून बचावलेली पिके हातची जावू नये, यासाठी शेतकऱ्यांची पिके काढण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच सध्या ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावले आहे. खरिपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीकडून अपेक्षा आहे. सध्या गहू व हरभरा मळणीसाठी वेग आला आहे. शेतकरी हार्वेस्टरद्वारे गव्हाची मळणी करीत आहे तर काही शेतकरी मजूर लावून हरभऱ्याची सोंगणी करीत आहे. सध्या बाजारपेठेत गहू व हरभऱ्याला चांगला भाव आहे.
चौकट
दरवर्षी शेती पाण्याअभावी खाली राहत होते. यंदा मात्र, पुरेसा पाऊस झाल्याने रब्बीत अपेक्षा उंचावल्या. यामुळे रब्बीत हरभरा व गहूची पेरणी केली. सध्या हरभरा सोंगणी करुन एकरी दोन हजार रुपये मजुरी दिली आहे.
रामेश्वर पाटील, शेतकरी, पारध बू.