उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:31 AM2021-05-11T04:31:45+5:302021-05-11T04:31:45+5:30
जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांप्रमाणेच उद्योग जगतही हादरले आहे. काही मोजके उद्योग वगळता अन्य उद्योग नावालाच ...
जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांप्रमाणेच उद्योग जगतही हादरले आहे. काही मोजके उद्योग वगळता अन्य उद्योग नावालाच सुरू असल्याचे वास्तव दिसून आले.
जालना शहर व परिसरात स्टील उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आहे. परंतु, या उद्योगातही ऑक्सिजनची मोठी मागणी असल्याने हा उद्योग अडचणीत सापडला आहे. केवळ ३० सिलिंडर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे तर प्रत्यक्षात शंभर ते दीडशे सिलिंडरची गरज असते. ती पूर्ण होत नसल्याने हा उद्योग संकटात सापडला आहे. स्टीलप्रमाणेच लघु उद्योगही जालन्यात मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. असे असले तरी कोरोनामुळे रोजंदारीवर येणाऱ्या कामगारांमध्ये मोठी घट झाली आहे तर दुसरीकडे कुशल कामगारांची पाहिजे तेवढी मागणी पूर्ण होत नसल्याने उद्योग अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने यावेळी कुलर निर्मिती उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. त्यापाठोपाठ व्हेंडर अर्थात मोठ्या उद्योगांना त्यांच्या मागणीनुसार साहित्य पुरविणे या उद्योगाला शक्य होत नाही. पूर्वीप्रमाणे मागणीतही मोठी घट झाली आहे.
जालना शहरात बियाणे उद्योग सध्या तेजीत असून, तेथे जास्त करून महिला कामगारांची संख्या असल्याने या उद्योगाला अडचण येत नाही.
कच्चा माल मिळण्यात अडचणी
संपूर्ण राज्यभर आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळणारा कच्चा मालही सहज उपलब्ध होत नाही. अधिकचे भाडे आकारून तो रस्ते वाहतुकीद्वारे आणावा लागत आहे. परदेशातून येणारे स्क्रॅब हा स्टील उद्योगासाठी महत्त्वाचा कच्चा माल असतो. परंतु, त्याचेही दर वाढलेले असल्याने तो दखील स्थानिक उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अत्यावश्यक सेवा सोडल्यास वाहतुकीचीही अडचण निर्माण झाली आहे.
कोरोनाचा फटका रोजंदारीलाही बसला आहे. आधी आम्हाला एक दिवस काम केल्यास चारशे रुपये मिळत होते. आज ज्या कंपनीत चारशे रुपये देत होते, तेथे केवळ दोनशे रुपये देऊन काम करून घेतले जात आहे. ही बाब आर्थिक संकटाची म्हणावी लागेल.
-बिहारीलाल परदेशी-डोगरा
कोरोनामुळे अनेक उद्योग अडचणीत आल्याने आम्हाला रोजंदारीवर मिळणारा (कॅज्युअल) तसेच कामगारांना आता काम मिळणे अवघड झाले आहे. जवळपास पाचशेपेक्षा अधिक कामगारांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
- हरिदास जाधव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्योगांना सूट दिली आहे. यामुळे किमान उद्योग तरण्यास मदत झाली आहे. शंभर टक्के उत्पादन होत नसले, तरी किमान ६० ते ४० टक्के उत्पादन करून कामगारांचे वेतन, वीजबिल आणि अन्य खर्च यामुळे भागविण्यास मदत होत आहे.
-प्रज्ञेश केनिया
कोरोनामुळे अन्य व्यवसायांसोबतच लघु उद्योगही अडचणीत आले आहेत. ही बाब केंद्र आणि राज्य सरकारने लक्षात घेऊन या उद्योगांना विशेष पॅकेज जाहीर करावे. या पॅकेजमधील २५ टक्के हिस्सा हा कामगारांसाठीदेखील ठेवावा, जेणेकरून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटवणे शक्य होईल. - अविनाश देशपांडे, अध्यक्ष, लघु उद्योग भारती
कोरोना असला तरी सरकारने उद्योग बंद केले नाहीत, ही बाब सकारात्मक म्हणावी लागेल. यामुळे ज्या ऑर्डर घेतल्या होत्या, त्या पूर्ण करताना अडचणीत येत नाहीत. कुशल कामगारांच्या मदतीतूनच ही कामे केली जात असल्याने उद्योग जगतात मरगळ आलेली नाही.
- सुनील रायठठ्ठा