निर्बंध कधी आणि कसे लावावेत, केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात : राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 11:46 AM2022-01-04T11:46:28+5:302022-01-04T11:49:13+5:30
Rajesh Tope: महाराष्ट्रात चाळीस टक्के बेड रुग्णांनी व्यापल्यावर आणि ऑक्सिजनची मागणी ही दररोज ७०० मेट्रिक टनांवर पोहोचल्यावर आम्ही राज्यात लॉकडाऊनचा विचार करणार असल्याचेही आपण केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असल्याचेही टोपे म्हणाले.
जालना : कोरोनासह ओमायक्रॉनचा ( Omicron Variant ) धोका वाढत आहे. ही बाब चिंतेची असून, यासाठी कोरोना ( Corona Virus ) रोखण्यासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन काटेकोरपणे होणे गरजेच आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी एकदाच निर्बंध कधी आणि कसे लावावेत, याचे दिशानिर्देश राज्यांना देण्यासह ओमायक्रॉनवरील औषधींचा स्वस्तात पुरावा करावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
जालन्यात टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महिला व बाल रुग्णालयात १५ ते १८ वर्षांवरील मुलांना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. कोरोनासह ओमायक्राॅनचा धोका वाढत आहे. मुंबईसह अन्य शहरांमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आपला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद झाला. त्यावेळी आपण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यात प्रामुख्याने १२ ते १५ वर्षांच्या मुलांचेही लसीकरण व्हावे, ही प्रमुख मागणी होती.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसीचा अतिरिक्त साठा राज्याला देण्याची मागणी आपण त्यांच्याकडे केली असून, ती अनुक्रमे ५० लाख आणि ४० लाख डोसची गरज नोंदविली असल्याचे ते म्हणाले. निर्बंध लागू करण्यासाठीचे निकषही एकसारखेच असावेत, अशी मागणी केली. महाराष्ट्रात चाळीस टक्के बेड रुग्णांनी व्यापल्यावर आणि ऑक्सिजनची मागणी ही दररोज ७०० मेट्रिक टनांवर पोहोचल्यावर आम्ही राज्यात लॉकडाऊनचा विचार करणार असल्याचेही आपण केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असल्याचेही टोपे म्हणाले. खर्चाच्या मुद्द्यावर आम्ही लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगून, मास्क वापरताना तो वॉशेबल असावा, अशी आपली अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. राज्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु संयाेजकांकडून त्याचे उल्लंघन होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. नेत्यांनीही गर्दीत जाणे टाळले पाहिजे, असा सल्लाही टोपे यांनी दिला.
औषधींचे दर कमी करावेत
ओमायक्रॉनवर प्रभावी ठरणारे औषध मोनोक्लोवल अँटिबॉडीजची किंमत ही एक लाख २० हजार रुपये आहे. ती सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या औषधींचे दर तातडीने कमी करून ती मोफत देता येईल काय, याबाबतही विचार करण्याची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केल्याचे सांगितले. रेमडेसिविरप्रमाणे या औषधींची मागणी वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.