वाहतूक कोंडीचा ‘शनी’ सुटणार कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:18+5:302021-09-27T04:32:18+5:30
जालना : शहरांतर्गत प्रमुख मार्गासह अंतर्गत भागातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाचा ‘शनी’ शहरवासीयांच्या मागे चांगलाच लागला आहे. विशेषत: लाखो रुपये ...
जालना : शहरांतर्गत प्रमुख मार्गासह अंतर्गत भागातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाचा ‘शनी’ शहरवासीयांच्या मागे चांगलाच लागला आहे. विशेषत: लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध भागांत वाहतूक सिग्नल उभा करण्यात आले आहेत. काही ठिकाणी लोकसहभागातून सिग्नल बसविण्यात आले आहेत; परंतु यावर केलेला खर्च वाया गेल्याचे चित्र आहे.
उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील बाजारपेठेत विविध साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा रोड, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा चौफुलीपासून सुरू होणारी वाहतूक कोंडी संबंधित व्यक्ती शहराबाहेर जाईपर्यंत कायम असते. शहरातील वर्दळ आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बसविण्यात आले होते; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी हे सिग्नल बंद पडले आहेत. त्यात लोकसहभागातून सुभाष चौक, शनी मंदिर, अंबड चौफुली येथील वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आले; परंतु महिना- दीड महिन्यातच ते सिग्नल बंद पडले आहेत.
शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात असली तरी अनेक चालक वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचारी नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, याबाबत शहर वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
वाहतूक कोंडी तरीही दुर्लक्ष
शहरातील शनी मंदिर परिसरात होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्न नवीन नाही. या भागात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. येथे पोलीस कर्मचारी असतानाही त्यांचे वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. विशेषत: या वाहतूक कोंडीत काही काळ एक रुग्णवाहिकाही अडकली होती. सुदैवाने त्यात रुग्ण नव्हता इतकेच!
वरिष्ठांनी लक्ष द्यावे
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नवीन नाही. शहरातील प्रमुख मार्गासह शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरही वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.