कुठे खिडक्या तुटल्या, तर कुठे छताला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:14+5:302021-03-05T04:30:14+5:30
दीपक ढोले जालना : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे शासकीय निवासस्थाने दिली जातात ; परंतु, या ...
दीपक ढोले
जालना : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे शासकीय निवासस्थाने दिली जातात ; परंतु, या निवासस्थानांची मागील काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. कुठे खिडक्या तुटल्या तर कुठे छताला गळती असल्याने अधिकारी व कर्मचारी किरायाच्या घरात राहत आहे. चांगल्या स्थितीत असलेल्या ८१४ पैकी केवळ ४०० घरांमध्येच पोलीस राहत असल्याचे दिसून येत आहे.
दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जालना जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस ठाणे व शहराच्या ठिकाणी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. जालना शहरातील रामनगर परिसर व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे १९५४ साली निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. तेव्हापासून या निवासस्थानांची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे आता ही निवासस्थाने मोडकळीस आली असून, याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष आहे. निवासस्थानांच्या खिडक्या तुडल्या आहेत. तर कुठे छताला गळती लागली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी या निवासस्थानात राहण्यास तयार नाहीत. शहरात किरायाने खोली घेऊन हे पोलीस आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.
आमच्या प्रतिनिधीने बुधवारी पोलीस कॉलनीची पाहणी केली असता, ही बाब उघडकीस आली. सर्वच काॅलनीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. काही निवासस्थानांची दयनीय अवस्था झाल्याचे दिसले. येथे कोणीही राहत नसल्याने ही निवासस्थाने निकामी झाली आहे. याकडे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ना पाणी ना रस्ते
पोलीस कॉलनीतील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहेत. काही रस्त्यांची तर कामेच झाली नसल्याने वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते. येथील एका महिलेने सांगितले की, आम्हाला १० ते १५ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे विकतचे पाणी घ्यावे लागते. तर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे तिने सांगितले.
किरायासाठी मिळतात केवळ १९०० रूपये
जे पोलीस कर्मचारी किरायाने राहतात. त्यांना शासनातर्फे किराया दिला जातो. सुरूवातीस एका पोलीस कर्मचाऱ्याला १५०० रूपये मिळायचे. आता १९०० रूपये मिळत आहे. सध्या एका खोलीसाठी तीन ते साडेतीन हजार रूपये किराया द्यावा लागतो. त्यामुळे शासनाकडून मिळालेला किराया हा अत्यल्प आहे.
काहींनी स्वखर्चातून केली डागडुजी
जे अधिकारी व कर्मचारी पोलीस निवासस्थानात राहतात. त्यांनी स्वत; हा खर्च करून डागडुजी केली आहे. याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, मी पोलीस कॉलनीत राहतो. माझ्या घराच्या खिडक्या तुटल्या होत्या. याबाबत मी अनेकवेळा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारी केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मी स्वतच खिडक्याची दुरूस्ती केली.
चौकट
जिल्ह्यातील बहुतांश पोलीस निवासस्थानांची दुरवस्था झालेली आहेत. याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव देखील पाठविला आहे. परंतु, अद्याप त्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. मंजुरी मिळताच कामाला सुरूवात करू.
विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना
जिल्ह्यातील एकूण निवासस्थाने
१००१
दुरवस्था झालेली निवासस्थाने
१८७
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या
१६३०
निवासस्थानात राहत असलेल्या पोलिसांची संख्या
४००