तूर ठेवायला कुणी जागा देता का... जागा... ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:56 AM2018-03-22T00:56:19+5:302018-03-22T00:56:19+5:30
हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच नाही. आठवड्यापासून जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागेचा शोध पूर्ण झाला नाही. यामुळे आठवड्यापासून हमीभाव केंद्र बंद असल्याने नोंदणीकृत शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच नाही. आठवड्यापासून जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागेचा शोध पूर्ण झाला नाही. यामुळे आठवड्यापासून हमीभाव केंद्र बंद असल्याने नोंदणीकृत शेतकरी हवालदिल झाले आहेत.
१ जानेवारीपासून जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी करण्यास सुरूवात करण्यात आली. अडीच महिन्याच्या कालावधीत आत्तापर्यत ६ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंद केली आहे. मात्र शासकीय गोदाम गेल्यावर्षीच्या तुरीने गच्च भरून आहेत. यामुळे सुरूवातीपासून हमीभाव केंद्रावर तूर खरेदी प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. १२ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मात्र शासकीय गोदामात तूर ठेवायला जागाच नसल्याने १५ मार्चपासून जिल्ह्यातील आठही केंद्रावरील तूर खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी नोंदणीकृत शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत आहेत. मात्र केंद्रच ठप्प असल्याने याबाबत विचारपूस कोणाला करावी, अशी चिंता शेतक-यांना पडली आहे. त्यातच साडेतीन कोटी रूपयांची तूर खरेदी करण्यात आली. मात्र, अद्याप शेतक-यांच्या बँकखात्यात पैसे जमा होण्यास विलंब होत असल्याची खंत शेतक-यातून व्यक्त होत आहे. वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सूर्यवंशी काही दिवसांपूर्वीच शहरात येऊन तूर ठेवण्यासाठी जागेचा शोध घेतला. जिल्हा पणन विभागाचे गोदाम भोडतत्वावर घेऊन त्यात खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी हालचाली अधिकारी स्तरावर झाल्या होत्या मात्र अद्यापही मार्केटिंग विभागाचे गोदाम खुले करण्यात आले नसल्याने जागेअभावी जिल्ह्यातील तूर खरेदी ठप्प आहे. तूर खरेदी केव्हा पूर्ववत होणार, याची आस शेतक-यांना आहे.
हरभ-यासाठी ३०० शेतकºयांची नोदणी
एकीकडे तूर खरेदी ठप्प असतांना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ३०० शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र तूर खरेदीच ठप्प असल्याने हरभरा खरेदी केव्हा सुरू होईल, याची शेतक-यांना उत्सुकता आहे. सध्या हमीभाव केंद्रावर १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टरी हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात वाढ करून हेक्टरी २० ते २५ क्विंटल खरेदी करण्याची मागणी हिवर्डी येथील शेतकरी शंकर भुतेकर यांच्यासह काही शेतक-यांनी केली आहे.
लवकरच तूर खरेदी...
याबाबात जिल्हा मार्केटींग अधिकारी गजानन मगरे यांना विचारले असता तूर ठेवण्यासाठी भोकरदन मार्गावर असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात तात्पुरती सोय करण्यात आली असून लवकरच तूर खरेदी सुरळीत होणार आहे. सदर गोदामात ५ हजार क्विंटल तूर ठेवण्याची क्षमता असल्याचे मगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.