पाच लाखांची लाच घेताना कृषी अधिका-याला अटक, अन्य तिघेही ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 09:29 PM2018-02-27T21:29:18+5:302018-02-27T21:29:18+5:30
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जाणाºया झाडांचे मूल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकाणाºया तालुका कृषी अधिकाºयांसह तीन खाजगी व्यक्तींना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शहरातील नूतन वसाहत भागातील उड्डाणपुलाखाली मंगळवारी दुपारनंतर ही कारवाई करण्यात आली. यातील एका संशयिताकडून एसीबीने एक रिव्हॉल्व्हर, राऊंड व कार जप्त केली आहे.
अटक केलेल्या संशयितांमध्ये जालना तालुका कृषी अधिकारी रामेश्वर अण्णासाहेब रोडगे (४८) अनंत बाबुराव नाल्टे उर्फ माने (६८), बालासाहेब ज्ञानोबा वाघमारे (४३, सर्व रा. रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) व सुभाष गणपतराव खाडे (४०,रा. जांबसमर्थ, ता. घनसावंगी, जि.जालना ) यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची अहंकार देऊळगाव (ता. जालना) येथील शेती समृद्धी महामार्गासाठी संपादित झाली आहे. संपादित जमिनीवरील झाडांचे कृषी विभागाकडून तीन कोटी एक लाखांचे मूल्यांकन काढण्यात आले होते. मात्र, तक्रारदाराने उपविभागीय अधिकारी कार्यालयात जावून चौकशी केली असता, मूल्यांकन दोन कोटी सतरा लाख रुपये दाखविण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदाराने झाडांचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. काही दिवसानंतर संशयित सुभाष खाडे हा तक्रारदारास भेटला. तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी पाठविल्याचे सांगून मूल्यांकन वाढवून देण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदाराने संशयित अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे व सुभाष खाडे यांना पाच लाख रुपये दिले. उर्वरीत पैसे काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. उर्वरीत पैशाची खात्री म्हणून तक्रारदाराकडून साडेसात लाखांचे दोन धनादेश गहाण म्हणून घेण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराच्या खात्यावर संपादित झाडांसह इतर असा सुमारे आठ कोटी रुपयांचा मोबदला जमा झाला.
दरम्यान, तक्रारदाराच्या मुलाच्या नावावरील जमीनही समृद्धी महामार्गासाठी संपादित झाली आहे. या जमिनीवरील झाडांचे मूल्यांकन कृषी विभागाने ३९ लाख रुपये काढले. परंतु उपविभागीय कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर केवळ १६ हजार रुपयांचे मूल्यांकन काढल्याचे तक्रारदारास समजले. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दिल्यानंतर तक्रारदाराने अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे व सुभाष खाडे यांच्याशी बोलणी केली. त्यांनी पूर्वीेचे १५ लाख रुपये दिले नाही तर पुनर्मूल्यांकन होणार नाही म्हणून सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीचे पडताळणी केली असता, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी उर्वरीत १५ लाख रुपये देण्यासाठी मंगळवारी भेटण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने उड्डाणपुलाखाली सापळा लावला असता, संशयित अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे व सुभाष खाडे यांना तक्रारदाराकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. बालासाहेब वाघमारे याच्याकडून पथकाने रिव्हॉल्व्हर, फायर राऊंड व कार जप्त केली. त्यानंतर जालना तहसील कार्यालयाच्या परिसरातून तालुका कृषी अधिकारी रोडगे यांना ताब्यात घेण्यात आले.
उशिरा वैद्यकीय तपासणी
सर्व संशयितांवर येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.