बाजारपेठेत पांढऱ्या सोन्याला झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:47+5:302021-09-19T04:30:47+5:30
फकिरा देशमुख भोकरदन : सध्या बाजारपेठेत पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला वाढीव दरामुळे चांगलीच झळाळी मिळत आहे. खुल्या ...
फकिरा देशमुख
भोकरदन : सध्या बाजारपेठेत पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला वाढीव दरामुळे चांगलीच झळाळी मिळत आहे. खुल्या बाजारपेठेत ६ हजार ५० रुपये हमीभावापेक्षा १ हजार ५०० रुपयांनी कापसाचे दर वाढले आहेत. कापसाचा भाव ७ हजार १०० रुपयांपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तालुक्यात गतवर्षी ४७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती, ती एकूण लागवड क्षेत्राच्या ५० टक्के होती. मात्र, या वर्षी ३८ हजार ३४० हेक्टरमध्येच कापूस लागवड करण्यात आली आहे. शेतकरी सोयाबीन व मिरची लागवडीकडे वळाले आहेत. या हंगामात मिरचीचे पीक पूर्ण हातचे गेले. मात्, सोयाबीनचे पीक बहरले आहे. कापूससुद्धा चांगला आलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे लागवड क्षेत्र तब्बल १२ हजार हेक्टरने घटले आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यातच सध्या जागतिक पातळीवर कापसाच्या गठाणला मागणी वाढली आहे. गठाणला सध्या ५३ ते ५६ हजार रुपयांचा भाव आहे. तर, २ ते ३ हजार रुपये क्विंटल असलेली सरकी तब्बल ३ हजार ७०० रुपये भावाने विकली जात आहे. त्यामुळे कापसाच्या भावात तेजी राहणार आहे. अमरावती, जळगाव जिल्ह्यांत उन्हाळी लागवड केलेल्या कापसाला ८ ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. असे असले तरी यंदा कापूस ७ ते ८ हजार रुपयांच्या भावाने विक्री होईल, असे कापूस उद्योजक सांगत आहेत.
जागतिक पातळीवर तेलाचे भाव वाढले आहेत. शिवाय, कापसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकाची काळजी घ्यावी.
रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी
कापसाचे भाव आता चांगले आहेत. मात्र, शेवटपर्यंत हे भाव टिकले पाहिजेत. सध्या कापसाचे पीक चांगले बहरून आले आहे. मात्र, बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्रिफस (कोकडा) पडला आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.
विष्णू सोनुने, शेतकरी पळसखेड मुर्तड
सध्या तेलाचे भाव वाढले आहेत. त्याचप्रमाणे जगात कापूस गठाणची मागणी वाढली आहे. ४५ हजार रुपयांस विकली जाणारी गठाणं ५३ ते ५६ हजार रुपयांस विकली जात आहेत. सरकीचे भाव ३ हजार ७०० झाले आहेत. त्यामुळे या वर्षी कापसाला शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त भाव राहणार आहे.
राजेंद्र बाकलीवाल, व्यापारी