कुणी अधिकारी देता का...?; जालना नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:42 PM2018-07-06T14:42:44+5:302018-07-06T14:43:49+5:30
जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे.
जालना : जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे. या चार अभियंत्यासह कर्मचाऱ्यांची जवळपास २७ पदे रिक्त आहेत. ही रिक्तपदे तातडीने भरावीत अशी मागणी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्ह्यातील जालना पालिका ही एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. सध्या या पालिके अंतर्गत १५० कोटी रूपयांची अंतर्गत जलवाहीनी अंथरण्याचे काम सुरू आहे. या कामावर तांत्रिक लक्ष ठेवण्यासाठी एकही जबाबदार अभियंता नसल्याने संबंधित कंत्राटदाराच्या मर्जीनुसार हे काम सुरू आहे. एकूणच जालना पलिकेचा आवाका पाहता येथे आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने प्रशासन चालवायचे कसे असा प्रश्न नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंची भेट घेतली असता मांडला. याबाबत नगराध्यक्षांनी नगरविकास विभागाच्या सचिवांसह विभागीय आयुक्तांनाही पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ता केंद्र असताना अशी स्थिती
जालना हे सत्ता केंद्र आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री तसेच राज्यमंत्री अशी तीन महत्वाची सत्ता केंद्र येथे आहेत. असे असताना चार अभियंत्यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नवीन अभियंते हे तातडीने देण्यासाठी या सत्ताधाऱ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. जालना नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात असल्यानेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बोलून दाखवले.
कामे लांबली
आज पालिकेत अेनक पदावरील महत्वाचे अधिकारी, कर्मचारी नसल्याने सामान्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.