"ओबीसी आरक्षणाने न्याय मिळतो, हे सांगणारे जरांगेंचे सल्लागार कोण?"; लक्ष्मण हाकेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:52 PM2024-06-19T13:52:41+5:302024-06-19T14:01:04+5:30
वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव बेमुदत उपोषणाच्या सातव्या दिवशी राज्यभरातून दुचाकी, चारचाकी रॅली वडीगोद्री येथे दाखल होत आहेत.
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : मनोज जरांगे हे जी बाजू मांडत आहेत त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे, ओबीसी आरक्षण मिळाल्यावर आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला न्याय मिळतो हे सांगणारे जरांगेचे सल्लागार कोण आहेत? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद दरम्यान केला. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे गेल्या सात दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावसाठी बेमुदत उपोषण करत आहेत. दोघांचीहि प्रकृती सध्या खालावलेली आहे.
महाराष्ट्रात शासनाने आतापर्यंत आमच्या आंदोलनाची दखल घ्यायला हवी होती. आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत, आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत. म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. पण माय बाप सरकार, ओबीसी ची भाषा समजून घ्या, आमची दखल नका घेऊ पण व्हीजेएनटी, ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्या, अशी विनंती हाके यांनी केली.
आरक्षण गरीबी हटाव कार्यक्रम नाही
गरजवंत मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो हे कोणी सांगितले. मायबाप सरकार समजून घ्या आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. कुणबी आणि मराठा वेगळा, त्यांचे आचार विचार वेगळे असल्याचे हाके यांनी सांगितले.
पुन्हा धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध
वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव बेमुदत उपोषणाच्या सातव्या दिवशी राज्यभरातून दुचाकी, चारचाकी रॅली वडीगोद्री येथे दाखल होत आहेत. आज उपोषणार्थी दोघांचीही प्रकृती पुन्हा खालवल्याने संतप्त ओबीसी बांधवांनी मंगळवारी दुपारी धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्तारोको केला. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा निषेध करत टायर जाळलले होते. यानंतर आज पुन्हा एकदा बुधवारी उपोषणार्थी यांना ना भेटीसाठी आलेल्या काही संतप्त आंदोलकांनी पंधरा मिनिटे त्याच ठिकाणी रास्ता रोको करत टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जमाव पांगवला. रस्त्यावर जाळलेले टायर बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.