राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर

By विजय मुंडे  | Published: October 28, 2024 12:29 PM2024-10-28T12:29:18+5:302024-10-28T12:35:54+5:30

महायुतीत शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा अद्याप सुटलेली नाही.

Who is the grand alliance against Rajesh Tope? CM Shinde, DCM Pawar's thrust for Ghansawangi | राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर

राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर

- विजय मुंडे
जालना :
जिल्ह्यातील पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघांतील जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, घनसावंगीसाठी सीएम एकनाथ शिंदे, डीसीएम अजित पवार यांनी चांगलाच जोर लावला आहे. शिवाय पाच पैकी चार मतदारसंघांत वंचितचे उमेदवार उभा राहणार असून, उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदारांची होणारी बंडखोरी राेखण्याचे आव्हान प्रमुख नेत्यांसमोर राहणार आहे.

उद्योगनगरी, सीड कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होत आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे विजयी झाले. या निकालामुळे मविआत इच्छुकांची गर्दी वाढली आहे. जागा वाटपात महायुतीत भाजप आणि मविआत राष्ट्रवादी शरद पवार गटाला प्रत्येकी तीन-तीन जागा खेचण्यात यश मिळाले आहे. भाजपने विद्यमान आमदार असलेले भोकरदन, बदनापूर आणि परतूर हे मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवले आहेत. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बदनापूर, घनसावंगी आणि भोकरदन हे विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे. परंतु, अपेक्षित जागा न मिळाल्याने जालन्यात भाजपचे विधानसभा प्रमुख भास्कर दानवे, बदनापुरात उद्धवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे आणि परतूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी बंडाचे निशान हाती घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे आव्हान प्रमुख पक्षातील नेत्यांसमोर राहणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काय
महायुतीत शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा अद्याप सुटलेली नाही. घनसावंगी येथे सीएम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिकमत उढाण यांनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आ. राजेश टोपे यांच्या विरोधात उढाण लढण्यासाठी तयारी करीत आहेत. परंतु, भाजपकडून इच्छुक असलेले आणि अपक्ष निवडणुकीची तयारी करणारे सतीश घाटगे यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी सुरू केला आहे. त्यामुळे घनसावंगीची जागा शिंदेसेनेकडे जाते की, अजित पवार गटाकडे जाते, यावर खलबते सुरू आहेत. ही जागा शिंदेसेनेकडे गेली तर मात्र अजित पवार गटाला जिल्ह्यात एकही जागा मिळणार नाही.

आज कुठे कोण आमदार
जालना - कैलास गोरंट्याल - काँग्रेस
घनसावंगी - राजेश टोपे - राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
भोकरदन - संतोष दानवे - भाजप
बदनापूर - नारायण कुचे - भाजप
परतूर - बबनराव लोणीकर - भाजप

Web Title: Who is the grand alliance against Rajesh Tope? CM Shinde, DCM Pawar's thrust for Ghansawangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.