आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 07:04 PM2021-12-21T19:04:26+5:302021-12-21T19:05:36+5:30
या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
भोकरदन : सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील गोरखनाथ नामदेव जिवरग ( 35 ) याचा गळा आवळून निर्घृणपणे खून करून मृतदेह देऊळगाव कमान येथे टाकल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून अटक असलेल्या आरोपीचा जामीन का घेतला नाही यावरून लखन कांतीलाल भोसले ( रा. टाकळी जिवरग ) याच्यासह अन्य तिघांनी खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील रहिवाशी असलेल्या गोरखनाथ जिवरग यांचा मृतदेह भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमान पाटीजवळील गोषेगाव शिवारातील रस्त्यालगतच्या एका खड्डयात सोमवार दिनांक 20 डिसेंबर रोजी आढळून आला होता. या खड्यात सोमवारी सायंकाळी एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती हसनाबाद पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला होता. मृताच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या व शरीरावर, डोक्यावर मारहाणीच्या जखमा असल्याने हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता.
या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा मयताची पत्नी रेखा गोरख जिवरग यांच्या तक्रारीहून संशयीत लखन भोसले रा.टाकळी जिवरग व इतर दोन अनोळखी इसमा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिस ठाण्यात भोसले यांच्या नातेवाईकांना अटक करण्यात आले होते. त्यांच्याच जामिनासाठी भोसले व इतर लोक माझ्या पतीकडे तगादा लावून होते. मात्र त्यांनी अटक असलेल्या आरोपींचा जामीन घेण्यास नकार दिला म्हणून पतीचा खून करण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, हसनाबाद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष घोडके, पोलिस कर्मचारी नामदेव जाधव, सागर देवकर, रामेश्वर सिनकर, शेख आसेफ, धनराज सुरे, नीलेश खरात, राहुल भागिले यांनी पाहणी केली.
आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल असे हसनाबाद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष घोडके यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटोळे हे करीत आहे.