'रुग्णाची तब्येत का सुधारत नाही'; जालन्यातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 01:04 PM2021-05-31T13:04:17+5:302021-05-31T13:04:51+5:30
तिघांनी मेडिकल, तसेच रुग्णालयाच्या काचा फोडल्या. यामुळे एकच खळबळ उडाली.
जालना : जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात असलेल्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांनी रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे.
या दगडफेकीमुळे ऑक्सिजनवर असलेल्या सहा रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे. कोरोनाचा एक रुग्ण गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. असे असतानाही त्यांची प्रकृती का सुधारत नाही, असा सवाल करून तिघांनी मेडिकल, तसेच रुग्णालयाच्या काचा फोडल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले; परंतु तोपर्यंत दगडफेक करणारे संतप्त नातेवाईक पसार झाले होते. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.