गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:59+5:302021-07-19T04:19:59+5:30
जालना : कोरोनाच्या निर्बंधांनंतर सर्वच व्यवहार हळूहळू सुरू झाले आहेत. एसटीची चाकेही रस्त्यावर धावत आहेत. सध्या जालना जिल्ह्यात २०० ...
जालना : कोरोनाच्या निर्बंधांनंतर सर्वच व्यवहार हळूहळू सुरू झाले आहेत. एसटीची चाकेही रस्त्यावर धावत आहेत. सध्या जालना जिल्ह्यात २०० बसपैकी १६० बस सुरू आहेत. अद्यापही ४० बस आगारातच उभ्या असून, अनेक गावांतील नागरिकांना बस सुरू नसल्याने टमटमचा आधार घ्यावा लागत आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने निर्बंध हटविले आहेत. सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. एसटी बसही सुरू झाल्या आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असतानाही काही गावांमध्ये अद्यापही बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टमटमने प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाने तातडीने बस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या गावांना टमटमचा आधार
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, हिसोडा, तडेगाव, पिंपळगाव, पारध वालसावंगी या गावांमधील काही फेऱ्या बंद आहेत. परतूर तालुक्यातील उस्मानपूर, रायपूर, आंबा, डोलारा, कावजवळा, बामणी वलखेड, श्रीधर जवळा, नांद्रा, वाढोणा आदी गावांत अद्यापही बस सुरू नाही. अंबड तालुक्यातील गोंदी, साडेगाव, कोठाळा आदी गावांतील बस बंद आहेत.
जिल्ह्यातील काही गावांना अद्यापही बस सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने बस सुरू कराव्यात. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- सागर शेंडगे, प्रवासी
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. आता सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बस सुरू कराव्यात.
-सूरज धबडकर, प्रवासी
५७ हजार कि.मी. प्रवास, पण फक्त शहरांचाच
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात १६० बस सुरू आहेत. या बसने जवळपास ५७ हजार कि.मी.चा प्रवास केला आहे; परंतु हा प्रवास फक्त शहरी भागासाठी झाला आहे. अद्यापही ग्रामीण भागात बस सुरू करण्यात आल्या नाहीत. शासनाने निर्बंध लादल्यामुळे अद्यापही अनेक बस बंद आहेत.
जिल्ह्यात २०० बस आहेत. त्यापैकी १६० बस सुरू आहेत. यातून दररोज १६ ते १७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. निर्बंध लादल्याने अनेक बस बंद झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही.
प्रदीप नेहूल, विभाग नियंत्रक, जालना