पत्नीस मारहाण; एसआरपीएफच्या जवानास तीन वर्षांची सक्तमजुरी
By विजय मुंडे | Published: May 31, 2024 07:52 PM2024-05-31T19:52:17+5:302024-05-31T19:53:23+5:30
सव्वातीन लाखांचा दंड, तीन लाख पत्नीस देण्याचेही आदेश
जालना : पत्नीस मारहाण करून शारीरिक, मानसिक त्रास देणाऱ्या एसआरपीएफच्या जवानास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व सव्वातीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यातील तीन लाख रुपये पत्नीस नुकसानभरपाई म्हणून देणे व २५ हजार रुपये सरकारजमा करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विशाल रंगनाथ वाघ (रा. सुखशांतीनगर, जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशाल वाघ हा एसआरपीएफमध्ये पोलिस अंमलदार असून, त्याचे अंजली यांच्यासोबत २०१०मध्ये लग्न झाले आहे. त्यांना दोन अपत्येही आहेत. लग्नानंतर विशाल वाघ हा पत्नीस शारीरिक, मानसिक त्रास देत होता. पत्नी अंजली यांनी २२ ऑगस्ट २०२१ रोजी तुमचे बाहेरील महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. मी पोलिसात फिर्याद देते, असे म्हणताच विशाल वाघ याने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलांनाही क्रूर वागणूक दिल्याची तक्रार अंजली वाघ यांनी सदरबाजार पोलिस ठाण्यात दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्षी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. एस. विजयसेनानी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी आरोपी विशाल वाघ याला कलम ४९८ अ भादंविमध्ये तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व ३ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास व कलम ३२३ भादंविमध्ये सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती ॲड. शोभा एस. विजयसेनानी यांनी दिली.
...यांची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणात सरकार पक्षाकडून ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, डॉक्टर, तपासिक अंमलदार एन. बी. भताने यांची साक्ष महत्त्वाची ठरल्याचे ॲड. विजयसेनानी यांनी सांगितले.