पत्नीला कारमध्येच जिवंत जाळले; अपघाताचा बनाव रचणारा पती अटकेत, धक्कादायक कारण...
By दिपक ढोले | Published: June 29, 2023 05:01 PM2023-06-29T17:01:27+5:302023-06-29T17:04:25+5:30
पत्नीचा घटस्फोट देण्यास नकार, पतीने तिला कायमच संपवलं
मंठा ( जालना) : तेरा वर्षांपासून मुलबाळ न झालेल्या पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पतीनेच अपघाताचा बनाव करून पत्नीला कारसह जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना मंठा तालुक्यातील शेगाव -पंढरपूर रस्त्यावरील हिवरखेडा येथे उघडकीस आली. सविता अमोल सोळंके (३३ रा. कारळा, ता. परतूर) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी अमोल गंगाधर सोळंके (रा. कारळा, ता. परतूर) याला ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मंठा तालुक्यातील शेगाव -पंढरपूर रोडवरील हिवरखेडा पाटीजवळ २३ जून रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास अमोल गंगाधर सोळंके यांच्या कारला अपघात होऊन आग लागली होती. या आगीत त्यांची पत्नी सविता सोळंके यांचा जळून मृत्यू झाला होता. याबाबत मंठा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश बुधवंत, पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवळे, पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, आसमान शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
या घटनेचा तपास पोलिस करीत असतांना, २८ जून रोजी बळीराम उत्तमराव जाधव (४० माजलगाव, जि. बीड) यांनी खून झाल्याची फिर्याद दिली आहे. मयत सविता अमोल सोळंके यांना मागील १३ वर्षापासून मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे संशयित अमोल हा घटस्फोट दे असे म्हणून सविता सोळंके यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत होता. मात्र, त्यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला. हाच राग मनात धरून अमोल यानेच पत्नी सविता यांना कारमध्ये टाकून जीवंत जाळले. नंतर अपघात झाल्याचा बनाव केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोकाॅ. शाम गायके हे करीत आहेत.
आरोपी अटकेत
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी अमोल सोळंके याला ताब्यात घेतले आहे. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.