पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून केला खून
By दिपक ढोले | Published: March 29, 2023 03:08 PM2023-03-29T15:08:56+5:302023-03-29T15:12:21+5:30
लग्नानंतर दोन मुली व दोन मुले झाली, त्यानंतर दोघांचे पटत नव्हते. यातूनच महिलेने पतीस सोडले
अंबड ( जालना) : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना अंबड शहरातील शारदानगर येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंडित भानुदास काळे असे मयताचे नाव आहे. घटनास्थळावरून तीन आरोपी फरार झाले आहे.
पंडित भानुदास काळे यांची मुलगी नंदा काळे हिचा विवाह आडूळ येथील संशयित किशोर शिवदास पवार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली व दोन मुले झाली. त्यानंतर किशोर व नंदा या दोघांचे पटत नव्हते. काही दिवसांपूर्वी ती पाचोड येथील एका व्यक्तीसोबत पळून गेली. त्यानंतर किशोर पवार हा नेहमी सासरा पंडित काळे यांना शिवागाळ करीत होता. माझ्या बायकोला नांदायला पाठावा, नाहीतर तुम्हाला बघून घेईल, असेही तो म्हणत होता.
दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पंडित काळे व त्यांचा मुलगा पारलेश काळे दोघे घरी बसले होते. त्याचवेळी संशयित किशोर पवार, नितीन जाधव व एक अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी पंडित काळे यांना मारहाण करून शिवागीळ केली. कंबरेची बंदूक काढून किशोर पवार याने पंडित काळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मंदाकिणी भोसले यांच्या फिर्यादीवरून तीन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.