पत्नीचा मृतदेह रुग्णवाहिकेत सोडून पतीचा पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:05 AM2017-11-18T00:05:22+5:302017-11-18T00:05:27+5:30
पत्नीचा मृतदेह भिवंडी येथून रुग्णवाहिकेत घेऊन आलेल्या पतीने गुरुवारी मध्यरात्री शहरातील शिवाजी चौकातून पोबारा केल्याचा प्रकार घडला. विवाहितेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकाच मृतदेहासह भोकरदन पोलीस ठाण्यात लावली.
फकिरा देशमुख/भोकरदन : पत्नीचा मृतदेह भिवंडी येथून रुग्णवाहिकेत घेऊन आलेल्या पतीने गुरुवारी मध्यरात्री शहरातील शिवाजी चौकातून पोबारा केल्याचा प्रकार घडला. विवाहितेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकाच मृतदेहासह भोकरदन पोलीस ठाण्यात लावली. अखेर भोकरदन पोलिसांनी युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत पतीला एका ढाब्यावरुन उचलून जाफराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. जवखेडा ठेंग या गावात शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले़
भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथील ़प्रियंका साहेबराव सोनोवणे हिचा देविदास पुंंजाराम घोडके (रा. जवखेडा ठेंग, ता़ जाफ्राबाद) याच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दापत्यास दीड वर्षाचा मुलगा आहे. कामानिमित्त हे दाम्पत्य भिवंडी येथे वास्तव्यास आहे. प्रियंकाने १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. भिवंडी येथील पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर प्रियंकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून देविदास व त्याचे नातेवाईक जवखेडा ठेंग येथे अंत्यसंस्कारासाठी मुंबईहून रूग्णवाहिकेत मृतदेह घेऊन निघाले होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजेच्या दरम्यान रुग्णवाहिका भोकरदन येथील शिवाजी पुतळ्याजवळ थांबली. पत्नीकडील नातेवाईक मारहाण करतील या भीतीने नातेवाईकांना घेऊन येतो, असे सांगून देविदासने तेथून पोबारा केला. त्यानंतर रूग्णवाहिकेचा चालक व प्रियंकाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका भोकरदन ठाण्यात आणली. त्यांनतर प्रियंकाच्या नातेवाइकांनी देविदासला आणल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. या प्रकरणाशी काही संबंध नसताना भोकरदन पोलिसांना काय करावे हे कळेना. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, फौजदार आऱएस़सिरसाठ, एल़ व्ही़ चौधरी यांनी नातेवाईकांची समजूत काढून सकाळी ७ वाजेपर्यंत रूग्णवाहिका भोकरदन ठाण्याच्या बाहेर उभी ठेवली. मारहाणीच्या भीतीने सिल्लोड रोडवरील राजस्थानी ढाब्यावर लपून बसलेल्या देविदास घोडकेला ताब्यात घेतले. त्याला जाफ्राबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी सकाळी १० वाजता जाफ्राबाद व भोकरदन पोलिसांच्या उपस्थितीत जवखेडा ठेंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़
भाचीचा घातपात केल्याचा आरोप मयत प्रियंकाचे मामा शेषराव उंबरकर यांनी केला. अंत्यसंस्काराच्या वेळी सासरकडील मंडळी हजर नव्हती, असे त्यांनी सांगितले़