रानडुकरांचा धाकलगावात हैदोस; चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:31 AM2019-02-07T00:31:46+5:302019-02-07T00:33:19+5:30
पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोंद्री : पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.
या घटनेत अश्मीरा जुमान पठाण या चार वर्षाच्या मुलीला तोंडात घेऊन पळून जात असतांना गावातील कुत्र्यांनी रानडुकरावर हल्ला करुन तिची सुटका केली. रानडुकराच्या धुमाकुळामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
रानडुकराने गावात दोन तास धुमाकूळ घातला यात भीमराव शेंडगे, शन्नोबी पठाण, त्यांची मुलगी अलबीरा जुमान पठाण (६), अश्मिरा जुमान पठाण (४) यांना चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत. अनेक नागरिकांवर हल्ला करून जखमी केले.गावापासून सर्व जंगल परिसर आहे. परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर परिसरात वाढला आहे. मंगळवारी सकाळी ऊसाच्या शेतातून पिसाळलेल्या रानडुकर गावात शिरले. भीमराव शेडगे हे घरात झोपले असता रानडुकराने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या हाताला चावा घेत त्यांना घराबाहेर ओढत आणले. त्यानंतर त्या रानडुकराने गावातील जुमान पठाण यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला. त्यात तीनजण जखमी झाले, तर अन्य एका घटनेत रानडुकराने दत्ता देवडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईला चावा घेऊन जखमी केले. तसेच भीमा गाढे यांच्यावरही हल्ला केला, त्यांच्या सर्तकतेमुळे ते त्यातून वाचले. चंद्रकांत गाडगे यांच्यावर देखील हल्ला केला असता त्यांनी तेथून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.
गेल्या काही महिन्यांपासून रानडुकराचे थैमान या भागात वाढले आहे. याकडे वनविभागाने तातडीने लक्ष देऊन त्यांचा पायबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांडून केली जात आहे.
गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन रानडुकराचा पाठलाग सुरू केला असता, त्याने गावातील शालिकराम बाळा सराफ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या हातातील काठीने रानडुकराचा प्रतिकार केला. यावेळी सर्व गावकºयांनी मिळून त्या रानडुकरावर हल्ला चढवून त्याला ठार केले. त्यानंतर खड्डा करून त्याला गावाच्या बाहेर पुरले