लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: September 6, 2023 09:04 PM2023-09-06T21:04:56+5:302023-09-06T21:05:13+5:30
निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जालना : निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असा शासनाचा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिला. शासनाच्या निर्णयावर आपण सहकाऱ्यांसमवेत चर्चा करुन गुरूवारी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाबाबतचा आपला निर्णय जाहीर करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाने घेलेल्या निर्णयाचा निरोप घेऊन आलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आज दिवसभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. ज्यांच्या निजामकालीन नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला जाईल यासह इतर मागण्या मान्य केल्या असून, ५० टक्क्यांहून अधिकची लढाई मनोज जरांगे यांनी जिंकली आहे. गुन्हे परत घेण्याबाबत सकारात्मक शब्द मिळाला आहे. शासनाच्या निरोपावर जरांगे सकारात्मक असून, उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करण्याची वेळ जरांगे यांनी दिल्याचे खोतकर म्हणाले.
राजेश टोपे म्हणाले...
यावेळी आ. राजेश टोपे यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देत शासनाच्या निर्णयावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहेत त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देणे, त्याचा तत्काळ जीआर काढणे, सरसकट महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाजबांधवांना एका महिन्यात कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार, मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आदी शासनाच्या निरोपावर सहकाऱ्यांसमवेत चर्चा करून उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेऊ, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
लागतील तेवढी कागदपत्रे देणार
मनोज जरांगे यांनी शासनाचा निरोप येण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला एका दिवसात अध्यादेश काढता येईल इतके पुरावे आपल्याकडे आहेत. निजामकालीन दस्तऐवजासह इतर कायदेशीर कागदपत्रे आहेत. एका कागदावरही हा अध्यादेश काढता येईल. तुम्ही रिक्षा भरून मागा, टिप्पर भरून मागा तितकी कागदपत्रे देतो. तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. काढलेला अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देऊ, असे आवाहन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी शासनाला केले.
मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा
पत्रकार परिषद सुरू असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करू, असे सांगितले.