वर्षातून दोन सराव परीक्षा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:26 AM2020-02-17T00:26:35+5:302020-02-17T00:27:39+5:30
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता जालना जिल्ह्यातील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची सराव परीक्षा दोनवेळेस घेण्यावर भर देण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता जालना जिल्ह्यातील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची सराव परीक्षा दोनवेळेस घेण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यात सध्या सहामही आणि वार्षिक परीक्षां व्यतिरिक्त या परीक्षा राहतील अशा सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठकीत दिल्या. तसेच जालना जिल्ह्यातील ५६ शाळा आदर्श करणाऱ्यावरही लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
टोपे यांच्या उपस्थितीत नुकतीच शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एक हजार शंभर पेक्षा अधिक शाळांची दुरूस्ती तसेच नवीन वर्ग खाल्याचे जवळपास दीड हजार प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
२६० शौचालय बांधणार
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११० शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये नाहीत. तर जवळपास १६० शाळांमध्ये मुलासांठी शौचालये नाहीत. असे एकूण २७० शौचलये उभारणीसाठी तातडीने प्रयत्न करण्यात येणार आहे. तो प्रस्तावही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सादर करावा असे निर्देश बैठकीत दिले आहेत.
श्रीराम तांडा शाळेचा आदर्श
मंठा तालुक्यातील श्रीराम तांडा तसेच बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेने ज्या प्रमाणे आपले वेगळेपण सिध्द केले आहे. त्याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील अन्य शाळा आदर्श करण्यावर भर देणार आहोत.
यासाठी नेमके कुठले धोरण असले पाहिजे, याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देशही टोपे यांनी दिले आहेत.