विकासाच्या मुद्यावर जिंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:31 AM2019-10-05T00:31:13+5:302019-10-05T00:35:24+5:30
भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे जाणार आहोत. त्या आधारेच ...
भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे जाणार आहोत. त्या आधारेच संतोष दानवे हे पुन्हा निवडून येणार आहेत, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच कोणत्याही पदाधिकारी, नेत्याला धाक दाखवून भाजपात घेतले नसल्याचेही ते म्हणाले.
भाजपाचे उमेदवार आ. संतोष दानवे यांनी शुक्रवारी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, निर्मला दानवे, रेणू दानवे, रमेश गव्हाड यांची उपस्थिती होती.
दानवे म्हणाले, विरोधी पक्षाच्या उमेदवाराने बारा वर्ष सत्ताधारी आमदार असताना काय विकास केला व पुढे काय करणार आहे हे न सांगता केवळ वैयक्तिक टिका व आरोप करण्याचे काम केले आहे. आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही.
मात्र गेल्या पाच वर्षामध्ये जालना लोकसभा मतदार संघात विकासात्मक किती मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात कोणी राहण्यास तयार नाही. तुम्हाला कार्यकर्ते संभाळता आले नाहीत, त्याचा आम्हाला कशासाठी दोष देता ? असा प्रश्न उपस्थित करीत तुम्ही सुध्दा भाजपामध्येच होता. मग तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी कोणी धाक दाखविला होता हे सांगा ? असा सवालही दानवे यांनी विरोधकांसमोर उपस्थित केला. यावेळी लोकजागरचे अध्यक्ष केशव जंजाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.
यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही आ. संतोष दानवे यांनी केलेल्या कामांचे कौतुक करीत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर दानवे, राजेंद्र देशमुख, विलास अडगावकर, कौतीक जगताप, आशा पांडे, विजयसिंह परिहार, ब्रम्हानंद चव्हाण, रमेश गव्हाड, केशव जंजाळ, सिध्दार्थ मुळे, नवनाथ दौड, मनिष श्रीवास्त्व, साहेबराव कानडजे, ओमप्रकाश चितळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
दानवे : विरोधकांकडे बोलण्यासाठी काही नाही
आमदार म्हणून निवडून आल्यापासून आजवर आपण केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून एक ना अनेक विकास कामे केली आहेत. केवळ सभागृहे बांधून विकास होत नाही. शेतकऱ्यांची उन्नती होण्यासाठी जलसंधारणाची कामे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने केळना, जुई, धामणा, गिरजा, जिवरेखा, रायघोळ, या नद्यांवर सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे बांधून सिंचन क्षमता वाढविली. या पाच धरणाची कामे केली. शिवाय ३३ केव्हीचे १० स्टेशन, रोहीत्र व मागेल त्याला शेततळे या योजनेतून राज्यात सर्वाधिक शेततळे या भागात देण्यात आल्याचे सांगत केलेल्या विकास कामांचा उहापोह केला.