जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019 : जालन्यात पुन्हा दानवे; काँग्रेसच्या औताडेंचा दारूण पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:25 PM2019-05-23T21:25:36+5:302019-05-23T21:26:40+5:30
दानवे यांनी सलग पाचव्यांदा संसदेत प्रवेश केला आहे.
जालना : कट्टर कार्यकर्त्यांच मतदारसंघात असलेले जाळे, संघटनात्मक बांधणी आणि शिवसैनिकांची मिळालेली साथ, या बळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघात एकहाती विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा दारूण पराभव करीत सलग पाचव्यांदा संसदेत प्रवेश केला आहे.
जालना लोकसभा मतदारसंघामध्ये स्व. बाळासाहेब पवार यांनीही दोन वेळेस खासदार म्हणून विजय मिळविला होता. त्यानंतर दानवे यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये दानवे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने वरवरचे बरेच प्रयत्न केले. परंतु, जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना शेवटपर्यंत ती कोणाला मिळेल आणि दानवेंना कोण टक्कर देईल हे ठरले नव्हते. त्यामुळे भाजपने ही संधी साधत आपली प्रचार यंत्रणा अधिक बळकट केली होती.
रावसाहेब दानवे हे ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत चंद्रपूर येथे उन लागल्याने आजारी पडले होते. जवळपास १५ दिवस प्रचारालाही फिरू शकले नाही. केवळ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विश्वासावरच त्यांनी पाचव्यांदा विक्रमी मतांनी विजयी होण्याची जादू करीत इतिहास घडविला आहे.
मतदारसंघः जालना
विजयी उमेदवाराचे नावः रावसाहेब दानवे
पक्षःभाजप
मतंः 693309
पराभूत उमेदवाराचे नावः विलास ओताडे
पक्षः कॉंग्रेस
मतंः 363619
पराभूत उमेदवाराचे नावः शरदचंद्र वानखेडे
पक्षः वंचित बहुजन आघाडी
मतंः 76811