तीन वर्षाच्या मुलीसह आईची विहिरीत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:58 AM2018-06-25T00:58:58+5:302018-06-25T00:59:27+5:30
भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रूक येथे आई व तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. ही आत्महत्या आहे की, घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रूक येथे आई व तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. ही आत्महत्या आहे की, घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पारध बुद्रूक येथील शेतकरी सतीश देशमुख हे त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या भुडकी नावाच्या शेतातील विहिरीत एक महिला व लहान बाळाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आदळला . देशमुख यांनी तात्काळ पारध पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे स.पो.नि.सुदाम भागवत आणि पो.कॉ. प्रशांत उबाळे, सुरेश डुकरे ,वाघ,जाधव आणि सरदार या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व येथे जमलेल्या काही ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील दोन्ही मृतदेह बाहेर काढले. सदरील दोन्ही मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. ही घटना परिसरात वा-यासारखी पसरली. परिसरातील सावंगी अवघडरव येथील ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. त्यापैकी शंकर पायघन रा.सावंगी अवघडराव यांनी हे दोन्ही मृतदेह ओळखले आणि सदरची महिला मयत सुनीता शंकर पायघन (वय २८) ही माझी पत्नी असून आरती (३ वर्ष) ही आपली मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी मृतदेह वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल केले. या घटनेचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करत असल्याचे सांगण्यात आले.