दारूबंदीसाठी महिलांनी जागून काढली रात्र, आंदोलनाला चोवीस तास; आता आरपारची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 02:08 PM2017-12-01T14:08:19+5:302017-12-01T14:09:07+5:30

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे

Woman fight against alcohol in Jalna | दारूबंदीसाठी महिलांनी जागून काढली रात्र, आंदोलनाला चोवीस तास; आता आरपारची लढाई

दारूबंदीसाठी महिलांनी जागून काढली रात्र, आंदोलनाला चोवीस तास; आता आरपारची लढाई

googlenewsNext

पारध (जालना) :  भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे. जोपर्यंत दारू विक्रीचे दुकान कायमचे बंद होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा या रणरागिनींना घेतल्याने पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांना  महिलांना दारू दुकान बंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया सांगण्याची वेळ आली आहे.

पिंपळगाव रेणुकाई येथे दोन देशी तर दोन विदेशी दारुची दुकाने असून येथे मुबलक प्रमाणात दारू मिळत असल्याने अनेकजण  दिवसभर दारूच्या व्यसनात बुडालेले असतात. गावातील अनेक तरुण देखील व्यसनाच्या विळख्यात ओढल्या जात आहेत. त्यामुळे गावात सतत भांडण तंटे होत आहेत. पती-पत्नी यांच्यात दारूमुळे वाद होण्याचे प्रकार वाढले असून, अनेकांचे संसार मोडले आहेत. तर काही मोडण्याच्या मार्गावर आहेत.  गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. या उलट हे प्रकार आणखीच वाढत गेले. अखेर गुरुवारी सकाळी शेकडो महिलांनी एकत्र येत एकत्र जमल्या. गावातील दोन्ही दारू दुकानांसमोर ठिय्या मांडून या दुकानांची शटर बंद करून घेत दारू विक्री बंद पडली. त्यामुळे दारू विक्रेत्यांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु महिलांनी पोलिसांना न जुमानले नाही.  दारू दुकानात कंटनेरमध्ये विक्रीसाठी आलेली दारूचे खोके स्वत: कंटनेरमध्ये चढून फेकून दिले. सायंकाळी शेतातून कामाहून आलेल्या काही महिलांनी या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यामुळे महिलांची ताकद आणखी वाढली . रात्री देखील महिलांचा मुक्काम दारू दुकानासमोर होता. विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणाचे डबे देखील या महिलांनी अंदोलन स्थळीच मागवले. शुक्रवारी दहा वाजता चोवीस तास उलटूनही महिला दुकांनासमोर ठाण मांडून आहेत.  उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रवीण ठाकूर यांनी आंदोलकर्त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्फळ ठरला. या संदर्भात पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत म्हणाले, की  आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिल्यास आम्ही दारूबंदीबाबत योग्य कार्यवाही करू.

आम्ही दिवसभर शेतात राबराब राबतो. मात्र घरीची माणसे गावात दारू पितात.  त्यामुळे संसार गाडा चालवायचा कसा. दारुची दुकाने बंद झाले की हे प्रश्न सुटू शकेल. म्हणून आम्ही आंदोलनाचा मार्ग निवडला.
- निर्मला चव्हाण, पिंपळगावरेणुकाई

 घरची माणसे दारू पीत असल्यामुळे त्यांचे घराकडे अजिबात लक्ष नाही. सर्व कुटुंब कायम तणावग्रस्त असते. म्हणून दारूबंदी होणे महत्वाचे आहे. जो पर्यंत येथील दारू कायम बंद होत नाही तो पर्यंत आम्ही अंदोलन माघे घेणार नाही.
- निर्मला चव्हाण,  पिंपळगावरेणुकाई

या महिलांचे अंदोलन करणे हे रास्त आहे. कारण संसार हा पती पत्नी दोघांचा आहे. पती जर दारू पिऊन कामधंदा करत नसेल तर या माऊल्यांनी काय करावे प्रशासनाने त्यांची हाक ऐकून त्यांना प्रतिसाद द्यावा. 
- ह.भ.प.ज्ञानेश्वर शेलूदकर-व्यसनमुक्ती पुरस्कर्ते
 

Web Title: Woman fight against alcohol in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.