दारूबंदीसाठी महिलांचा रात्रभर पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:19 AM2017-12-02T00:19:01+5:302017-12-02T00:19:18+5:30
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी ३६ तास उलटूनही सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी ३६ तास उलटूनही सुरूच आहे. जोपर्यंत दारू विक्रीचे दुकान कायमचे बंद होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा या रणरागिनींना घेतल्याने पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांवर महिलांना दारू दुकान बंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया सांगाण्याची वेळ आली.
पिंपळगाव रेणुकाई येथे दोन देशी तर दोन विदेशी दारुची दुकाने असून येथे मुबलक प्रमाणात दारू मिळत असल्याने अनेकजन दिवसभर दारूच्या व्यसनात बुडालेले असतात. गावातील अनेक तरुण देखील व्यसनाच्या विळख्यात ओढल्या जात आहेत. त्यामुळे गावात सतत भांडण तंटे होत आहेत. पती-पत्नी यांच्यात दारूमुळे वाद होण्याचे प्रकार वाढले असून, अनेकांचे संसार मोडले आहेत. तर काही मोडण्याच्या मार्गावर आहेत. गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. या उलट हे प्रकार आणखीच वाढत गेले. अखेर गुरुवारी सकाळी शेकडो महिलांनी एकत्र येत एकत्र जमल्या.
गावातील दोन्ही दारू दुकानांसमोर ठिय्या मांडून या दुकानांची शटर बंद करून घेत दारू विक्री बंद पडली. त्यामुळे दारू विक्रेत्यांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु महिलांनी पोलिसांना न जुमानले नाही. दारू दुकानात कंटनेरमध्ये विक्रीसाठी आलेली दारूचे खोके स्वत: कंटनेरमध्ये चढून फेकून दिले. सायंकाळी शेतातून कामाहून आलेल्या काही महिलांनी या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यामुळे महिलांची ताकद आणखी वाढली . रात्री देखील महिलांचा मुक्काम दारू दुकानासमोर होता. विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणाचे डबे देखील या महिलांनी अंदोलन स्थळीच मागवले. शुक्रवारी दहा वाजता चोवीस तास उलटूनही महिला दुकांनासमोर ठाण मांडून आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रवीण ठाकूर यांनी आंदोलकर्त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्फळ ठरला. या संदर्भात पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत म्हणाले, की आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिल्यास आम्ही दारूबंदीबाबत योग्य कार्यवाही करू.