महिलेने हॉटेलातील काम सोडले, संतापलेल्या मालकाने घरात घुसून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:21 PM2024-05-11T18:21:55+5:302024-05-11T18:22:12+5:30

हॉटेल मालकाचा महिलेच्या घरात घुसून हल्ला; आईला सोडविण्यास गेलेल्या मुलावरही केले जीवघेणे वार

Woman quits hotel job, enraged owner breaks into house and murders her | महिलेने हॉटेलातील काम सोडले, संतापलेल्या मालकाने घरात घुसून केला खून

महिलेने हॉटेलातील काम सोडले, संतापलेल्या मालकाने घरात घुसून केला खून

जालना : रामनगर साखर कारखान्यासमोरील एका हॉटेल मालकाने कामगार राहिलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवार, ११ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. आरोपी हॉटेल मालकास मौजपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सुभिद्रा वैद्य (वय ४०) या मागील सात-आठ वर्षांपासून परिसरातील लंका हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करत होत्या. चार महिन्यांपूर्वी सुभिद्राबाई यांना मुलगा सचिन वैद्य (वय २०) याने हॉटेलवर कामासाठी जाऊ नको अशी ताकीद दिल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये काम करणे बंद केले होते. दरम्यान, हॉटेलमालक गणेश कातकडे (वय ४५) हा कामावर येण्यासाठी महिलेवर दबाव टाकत होता. त्या कामावर जात नव्हत्या. याचा राग मनात धरून आरोपी गणेश कातकडे याने शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास सुभिद्रा वैद्य यांचे घर गाठले. घराची कडी वाजवून दार उघडण्यास भाग पाडले. त्या घराबाहेर येताच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर गणेश कातकडे याने सुभिद्रा वैद्य यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, घरात झोपलेला महिलेचा मुलगा सचिन वैद्य हा भांडणाच्या आवाजाने झोपेतून उठून बाहेर आला. गणेश कातकडे याने सचिन वैद्य याच्यावर देखील चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच सचिनच्या मित्राच्या हातावरदेखील वार केले. याप्रकरणी सुभिद्रा वैद्य यांची बहीण शितल ठोके (३१) यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शनिवारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमी सचिन वैद्य यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपीस अटक केली आहे 
रामनगर कारखाना परिसरातील लंका हॉटेलचा मालक असलेल्या गणेश कातकडे याने रात्री दारूच्या नशेत हॉटेल काम करणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेवर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, रविवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
- मिथुन घुगे, सहायक पोलिस निरीक्षक, मौजपुरी पोलिस ठाणे, जालना.

Web Title: Woman quits hotel job, enraged owner breaks into house and murders her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.