जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू
By महेश गायकवाड | Published: June 19, 2023 03:15 PM2023-06-19T15:15:08+5:302023-06-19T15:16:39+5:30
रुईमधून निघणारी धूळ नाकातोंडात जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला स्कार्प बांधला होता
- बद्रीनाथ मते
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरालगत असलेल्या शहागड रोडवरील पूनम जिनिंगमध्ये सोमवारी सकाळी एका महिला कामगाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. जिनिंगमधील रुईच्या बेल्टमध्ये अडल्याने ही महिला गंभीर जखमी झाली होती. गळ्याला फास लागल्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती येथील कामगारांनी दिली. मालन नारायण यशलोटे, वय ४५, असे मयत महिला कामगाराचे नाव आहे.
तीर्थपुरी-शहागड रोडवर बीड येथील एका व्यापाऱ्याची जिनिंग अँड प्रेसिंग आहे. या ठिकाणी सोमवारी नेहमीप्रमाणे कापसाच्या गाठी तयार करण्याचे काम सुरू होते. जिनिंग हाऊसमधून कापसाची रुई बेल्टद्वारे प्रेसिंगसाठी जात असताना बेल्टवरून बाजूला पडणारी रुई वेचण्याचे काम मालन यशलोटे करत होत्या. रुईमधून निघणारी धूळ नाकातोंडात जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला स्कार्प बांधला होता. हा स्कार्प व त्यानंतर साडी रुई वाहून नेणाऱ्या बेल्टमध्ये अडकली. त्यामुळे त्यांच्या तोंडाला व नाकाला मार लागला.
नाकातून रक्त आले होते व गळ्याला फास लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना ताबडतोब तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाकाडे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले. जालना येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना मालन यशलोटे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तीर्थपुरीत हळहळ व्यक्त होत आहे.