कुटुंब नियोजनात महिलाच पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:10 AM2020-03-23T00:10:20+5:302020-03-23T00:10:47+5:30
जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुष महिला दोघांनाही करता येते, पण जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. यंदा पुरुषांनी उद्दिष्टाच्या तुलनेत अवघ्या ११ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाढत्या महागाईत अपत्य एक किंवा दोन यापेक्षा जास्त नकोच, अशी भूमिका आता आधुनिक दाम्पत्यांनी घेतली आहे. यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी जनजागृती करावी लागली. लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी विशेष कार्यक्रम राबवला जातो. यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष किंवा महिला या दोघांपैकी एकाने केली, तरी पाळणा थांबवता येतो. पण पाळणा थांबवण्यासाठी इतरही उपाय केले जातात. परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कायमस्वरुपी पाळणा थांबवण्यासाठी केली जाते. कुटुंबाच्या तसेच सामाजिक दबावामुळे महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा ५० टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अवघ्या ११ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहे. पुरुष नसबंदीसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने पुरुष कुटुंब नियोजनासाठी धजावत नाहीत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दरवर्षी कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठीचे उद्दिष्ट घेऊन काम करतो. हे उद्दिष्ट पूर्ण करताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांनाही शस्त्रक्रियेसाठी उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार दोन अपत्यांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच तांबी बसवून उपाय योजना केल्याचा स्वतंत्र अहवाल आरोग्य विभाग तयार करते. यावर्षी आरोग्य विभागाला ११,३७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५६७७ महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत तर केवळ ११ पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत.
अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या महिलांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना शासनातर्फे ६०० रूपये दिले जातात. तसेच इतर महिलांना २५० रूपये दिले जातात. पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना १४०० रूपये दिले जातात.