अवैध दारू विक्रेत्याला महिलांचा चोप
By दिपक ढोले | Published: March 2, 2023 09:11 PM2023-03-02T21:11:42+5:302023-03-02T21:12:49+5:30
सदर दारू विक्रेत्याने महिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली.
दीपक ढोले, जालना: अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील महिलांनी रौद्ररूप धारण करून अवैध दारू विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
बारसवाडा येथील संशयित बंडू शिंदे हा अवैध दारूची विक्री करतो. यामुळे गावातील अनेकजण दारूच्या आहारी गेले आहेत. घरात वादावादी वाढली आहे. परिणामी, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही महिलांचे संसार उध्दवस्त होत आहे. त्रस्त असलेल्या गावातील महिला दारू विक्रेत्या बंडू शिंदे याच्याकडे गेल्या. आमच्या नवऱ्याला दारू का देता, असे म्हणताच सदर दारू विक्रेत्याने महिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली.
त्यानंतर महिलांनी रौद्ररूप धारण करून दारू विक्रेत्यास मारहाण केली आहे. सदर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच, गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर अवैध दारू विक्रेत्याची दुचाकी तपासली असता, त्यामध्ये अवैध दारू आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी संशयित बंडू शिंदे (रा. बारसवाडा) याच्याविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये अवैधरित्या दारूची विक्री केली जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम