महिलांनो संकटाला घाबरू नका...मी जगले, तुम्ही जगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:02 AM2018-04-12T01:02:43+5:302018-04-12T01:02:43+5:30

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांनी समाजाप्रती केलेला त्याग आपणास कदापीही विसरता येणार नाही. सावित्रीबाई नसत्या तर सिंधूताईचे अस्तित्व काय होते ? मी जीवनात आज जी उभी आहे, त्यामागे सावित्रीचीच पुण्याई आहे. असे विचार थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी मांडले.

Women do not fear the crisis ... wake up ... | महिलांनो संकटाला घाबरू नका...मी जगले, तुम्ही जगा...

महिलांनो संकटाला घाबरू नका...मी जगले, तुम्ही जगा...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभूर्णी : सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांनी समाजाप्रती केलेला त्याग आपणास कदापीही विसरता येणार नाही. सावित्रीबाई नसत्या तर सिंधूताईचे अस्तित्व काय होते ? मी जीवनात आज जी उभी आहे, त्यामागे सावित्रीचीच पुण्याई आहे. असे विचार थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी मांडले. त्या मंगळवारी घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी मंचावर महात्मा फुले लेखक- साहित्यिक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब अंभोरे, चळवळीतील व्याख्याते सावता तिडके आदींची उपस्थिती होती. आपल्या एक ते दीड तासाच्या ओघवत्या भावनिक संवादात माईंनी श्रोत्यांना खिळून ठेवले. महिलांनो, संसारात आलेल्या संकटांना घाबरू नका. जीवनात कित्येक वेळा मेलेली मी आज मरणाऱ्यासाठी जगते आहे. मी जगले तुम्ही जगा असे सांगतांना त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या अतीव दु:खाचे एक एक पदर उघडून दाखविले. माईचा जीवनप्रवास ऐकून अनेक महिलांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते.
मुलींनो अंग भरून कपडे घाला. तुमच्याकडे पाहताना पुरुषांना नारी नव्हे तर माय आठवली पाहिजे. मी नऊवारी नेसून सतरा देशांचा प्रवास केला. या नऊवारीचा पदर जिजाऊ, सावित्री आणि रमाईचा आहे. असे सांगताना त्या भावनिक झाल्या. बापाची गरिबी झाकण्यासाठी मुली तर देशाची गरिबी झाकण्यासाठी महिला असतात. तेव्हा पुरुषांनो, सावित्रीच्या लेकींंना तुम्ही जपा अशी आर्त हाक त्यांनी दिली. देण्यासाठी आपला जन्म झाला आहे. ओरबाडण्यासाठी नाही. तेंव्हा संस्कार जपा आणि संस्कार जगा. ज्या मराठवाड्याच्या रेल्वे लाईनने मी भीक मगितली त्याच मराठवाड्याने माझा मान- सम्मान केला. मला मराठवाड्याने भरभरून दिले. मला एवढं मोठं व्हायचं नव्हतं. पण तुमच्या व अनाथ लेकरांच्या प्रेमानेच मला कुठून कुठे नेऊन ठेवले. ज्या गावानं मला दगडं मारून हाकललं, त्यांनीच एक दिवस फुलं टाकून बोलावलं. दिवस नक्की उगवतो. मात्र तोपर्यंत रात्र सरण्याची वाट पहा. मुलींनो खूप शिका आणि सावित्रीचं स्वप्न साकार करा. अशी भावनिक सादही त्यांनी घातली.
तत्पूर्वी सावता तिडके व रावसाहेब अंभोरे यांनी महात्मा फुलेंच्या जीवन प्रवासावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीचे आदित्य तिडके यांनी केले. तर सूत्रसंचालन अतुल तिडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे गणेश भागवत, प्रकाश तिडके, शाम भागवत, ब्रह्मजी खेत्रे, सदाशिव तिडके, नीलेश भागवत, प्रवीण भागवत, किरण तिडके, दीपक खुणे, योगेश तिडके, पांडुरंग राऊत, रामेश्वर तिडके, रवी तिडके, विष्णू मालोदे, शिवराम तिडके, अमोल तिडके , आतिष तिडके यांनी परिश्रम घेतले.
माळी समाजातील युवकांनी थेट माईंना बोलावून समाज प्रबोधन घडवून आणले. माईंची भावनिक साद निश्चितच समाज परिवर्तनासाठी मैलाचा दगड ठरेल. अशा प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर अनेकांनी बोलून दाखविल्या. कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Web Title: Women do not fear the crisis ... wake up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.