कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती महिलांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:56 PM2019-04-12T23:56:52+5:302019-04-12T23:57:20+5:30

महिलांमध्ये कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती असून ती संधी तिला उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे प्रतिपादन रमाताई आहिरे यांनी येथे बोलताना केले.

Women have the power to face any challenge | कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती महिलांमध्ये

कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती महिलांमध्ये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एका चौकटीच्या आत महिलांनी स्वत:ला गुरफटून घेतले असतांनाच पुरुष प्रधान संस्कृतीने देखील स्त्रीला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. एकीकडे महिला नवनवीन आव्हानांना समोरे जाऊन आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवतांना दिसत असतांना दुसरीकडे मात्र, ती आजही अबलाच असल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता महिलांमध्ये कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती असून ती संधी तिला उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे प्रतिपादन रमाताई आहिरे यांनी येथे बोलताना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना आहिरे बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, विमल आगलावे, खमर सुलताना, कुसुम रगडे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आहिरे म्हणाल्या की, घटनेमुळे महिलांना आरक्षण मिळाले असले तरी त्याचा फायदा किती महिलांना झाला? किती महिला शेतकरी आहेत? किती महिला स्वत: उद्योजक आहेत? तर ही संख्या अत्यंत नगण्य अशीच आहे. त्याचे कारण महिलांनी जसे स्वत:ला एका चौकटीत अडकवून ठेवले आहे. तसेच तिला पुरुष प्रधान संस्कृतीने देखील बाहेर पडू दिले नाही. कोणतेही अधिकार तिच्याकडे ठेवले नाहीत. खरे तर महिलांना संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत. कायद्याच प्रत्येक कलम माहित नसले तरी किमान स्वसंरक्षणाबाबतीत असलेल्या कायद्याचे ज्ञान तरी महिलांनी आत्मसात केले पाहिजे, असे सांगून रमाताई आहिरे म्हणाल्या की, आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. शैक्षणिक आर्थिक दृष्टया आपली परिस्थिती मुळीच वाईट नाही. घरातली प्रत्येक स्त्री किमान दहावी- बारावीपर्यंत शिकलेली आहे. परंतु या शिक्षणाचा तिला फायदा आहे का ? खरे तर महिलांनी स्वत:हून पुढे येऊन घरातील आर्थिक नियोजन आणि अन्य कामातही दखल घेतली पाहिजे. असेही अहिरे म्हणाल्या.

Web Title: Women have the power to face any challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.