निराधारांच्या प्रश्नांसाठी महिला काँग्रेसचा जालना तहसील कार्यालयात ठिय्या
By विजय मुंडे | Published: June 2, 2023 06:17 PM2023-06-02T18:17:21+5:302023-06-02T18:18:38+5:30
योजनेतील जाचक अटींमुळे वृद्ध निराधार, विधवा, परितक्त्यांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
जालना : संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटींपासून लाभार्थींची सुटका करावी, दलालांवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजींनी तहसील परिसर दणाणून गेला होता.
वयोवृद्ध नागरिकांचे जीवन सुखर व्हावे, यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु, या योजनेतील जाचक अटींमुळे वृद्ध निराधार, विधवा, परितक्त्यांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या उपजीविकेचे साधन हे या योजनेंतर्गत मिळणारे अनुदान हेच आहे. परंतु, तहसील कार्यालयातील काही कर्मचारी, दलाल विविध कारणे सांगत लाभार्थींना अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्र, हयात प्रमाणपत्र, आधार लिंक आदी जाचक अटी रद्द कराव्यात, लाभार्थींच्या नावे जमा होणारे अनुदान विनाअट त्यांच्या खात्यावर जमा करावे यासह इतर विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांच्यासह पदाधिकारी, शहरातील लाभार्थी उपस्थित हाेते.