सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी २ हजारांची लाच स्वीकारतांना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By दिपक ढोले | Published: August 31, 2023 05:04 PM2023-08-31T17:04:00+5:302023-08-31T17:04:55+5:30
तक्रारदाराने सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) हा शेरा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता
जालना : सातबाऱ्यावरील अज्ञान पालनकर्ता हा शेरा कमी करण्यासाठी २ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना निकळक येथील महिला तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी पकडले आहे. रेखा पुरूषोत्तम मानेकर (३२ सजा निकळक, ता. बदनापूर) असे लाचाखोत तलाठी महिलेचे नाव आहे.
तक्रारदाराने सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) हा शेरा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. परंतु, तलाठी रेखा मानेकर यांनी काम केले नाही. तक्रारदाराने पुन्हा लेखी अर्ज केला. त्यानंतर तलाठी मानेकर यांनी दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. गुरूवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बदनापूर शहरात सापळा लावून तलाठी रेखा मानेकर यांना दोन हजारांची लाच स्वीकारतांना पकडले. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश बुजडे, गणेश चेके, जावेद शेख, कृष्णा देठे यांनी केली आहे.