भरदिवसा दर्शनासाठी आलेल्या महिलांना लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:44+5:302021-06-26T04:21:44+5:30
जालना : दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचा पत्ता लंपास केल्याची घटना अंबड तालुक्यातील दर्गा पराडा येथे शुक्रवारी ...
जालना : दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचा पत्ता लंपास केल्याची घटना अंबड तालुक्यातील दर्गा पराडा येथे शुक्रवारी सकाळी घडली. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपी महिलेला अटक केली असून, तिची कसून चाैकशी केली जात आहे. अंबड तालुक्यात मंगळसूत्र चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरली आहे.
बीड जिल्ह्यातील सावरगाव तांडा येथील मीनाबाई जाधव या कुटुंबासह अंबड तालुक्यातील दर्गा पराडा येथे गुरुवारी सकाळी दर्शनासाठी आल्या होत्या. त्या व त्यांची सून दर्शनासाठी रांगेत उभ्या होत्या. तेवढ्या दोन महिलांनी मीनाबाई जाधव यांच्या गळ्यातील १६ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व त्यांच्या सुनेच्या गळ्यातील २ हजार रुपयांचा पत्ता चोरट्यांनी चोरून नेला. त्यांना गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे समजले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मीनाबाई जाधव यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका महिलेला अटक केली आहे. पोलीस त्या महिलेची कसून चौकशी करीत आहेत; परंतु ती उडावाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास ढिलपे करीत आहेत.
जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणारी टोळी सक्रिय
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भरदिवसा मंगळसूत्र चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे या घटना भरदिवसा घडत आहेत. पुरुषांबरोबरच आता महिलाही मंगळसूत्र चोरी करीत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.