ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:26 AM2019-04-06T00:26:50+5:302019-04-06T00:27:28+5:30
शुक्रवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : गेल्या महिन्यापासून राजूरकर पाणी समस्येने त्रस्त झाले असून, संतप्त महिलांनी शुक्रवारी माजी जि. प. सदस्य सांडू पुंगळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंदे यांनी नियमित पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
राजूर येथे गेल्या एक महिन्यापासून ग्रामस्थ पाणी समस्येने हैराण झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यातच आसपास जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने हाल होत आहे. नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. सध्या दुष्काळी परिस्थीतीमुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक पदरमोड करणे शक्य नाही. त्यामुळे गावात संतापाची लाट पसरली होती. याबाबत माजी जि. प. सदस्य सांडू पुंगळे यांनी पुढाकार घेऊन महिला- पुरूषांसह शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच पाण्याविना होणारे हाल कथन केले. सांडू पुंगळे यांनी गावातील नागरिकांसह ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाडी, वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यानंतर महिलांनी ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी शिंदे यांनी दोन शासकीय पाणीपुरवठ्याचे टँकर मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.