पाण्यासाठी महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:27 AM2019-06-05T01:27:24+5:302019-06-05T01:27:48+5:30
मुस्लिमबहुल भागातील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलांनी नगरपालिकेत पाण्याची मागणी करत घोषणाबाजी करून ठिय्या मांडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : रमजान महिन्यात मुस्लिमबहुल भागासह इतर काही भागात पाणीपुरवठा करण्यात न. प. अपयशी ठरल्याने मंगळवारी रोजी शहरातील मुस्लिमबहुल भागातील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलांनी नगरपालिकेत पाण्याची मागणी करत घोषणाबाजी करून ठिय्या मांडला.
यावेळी नागरिकांनी निवेदन आणले होते, पण नगर परिषद मध्ये हा मोर्चा आला तेव्हा नगर परिषदेच्या कार्यालयात अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे नागरिकांचा आक्रोश वाढत गेला. नागरिकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना येथे बोलवण्याचा हट्ट धरला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगरसेवक शेख कदीर, नगरसेवक हामदू चाउस यांनी पालिकेत येऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रकरण वाढत चालल्याचे लक्षात येताच पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला होता. पाणीवाटपामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी यावेळी केला. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना नागरिकांनी निवेदन दिले.
भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणातून टँकर ने पाणीपुरवठा करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २२ मे रोजी प्रत्यक्ष भेट देऊन जाफराबाद जवळील पॉईंटचे काम आठ दिवसात पूर्ण करून शहराला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देऊनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. तो पॉइंट सुरू झाला असता, तर पाणी टंचाईचे निवारण्यात मोठी मदत झाली असती. आताही हा पॉइंट सुरू झाला तरच शहराला काही प्रमाणात पाणी मिळणार आहे. शहरात पाणी सोडताना भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप या वेळी नागरिकांनी केला. एकूणच या संतप्त नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केला.