Women's Day Special : बाईंच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ लगडलं ! : छायाबाई दत्तात्रय मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:10 PM2019-03-08T12:10:35+5:302019-03-08T12:10:50+5:30
महिलांना संधी दिली तर शेतीतूनही प्रगती शक्य
- संजय देशमुख
जालना : माहेरी शेती असतानाही कधी काम केले नाही. पण, सासरी आल्यावर कुटुंबाला हातभार लावला पाहिजे, या विचाराने त्या शेतीत उतरल्या. संघर्ष हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेला असतो. हे कळलेल्या ‘बाई’ने शेतीत झोकून दिले. कष्टाचे चीज झाले म्हणतात, पण जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील छायाबाई दत्तात्रय मोरे यांच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ पुरस्काराचे फळ लगडले!
१९८४ पासून शेतीत रमलेल्या कृषिभूषण छायाबाई मोरे म्हणाल्या, शेती ही एकच इंडस्ट्री अशी आहे ज्यात मूठभर टाकले की, पोते भरून मिळते. शेतीतून प्रगती साधायची असेल, तर महिलांना संधी आणि हक्क दिले पाहिजेत. शेती करताना मजूर मिळणे अवघड झाले आहे. कधी शेतात गडी आला नाही, तर महिला पदर खोचून कामाला लागतात. माहेरी असेपर्यंत मी कधी शेतात गेले नाही. लग्नानंतर मात्र कुटुंबाच्या भल्यासाठी शेतात काम करायला सुरुवात केली. पती दत्तात्रय मोरे यांनी वेळोवेळी भक्कम पाठिंबा दिला. त्यामुळेच शेतीतून प्रगती साधता आली. आज मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणावर भर देते. फवारणी करताना अडचण नको म्हणून कपाशीची लागवड केली. त्यातून मिनी ट्रॅक्टर जाईल अशा पद्धतीनेच ही लागवड केली. पाण्याचे महत्त्व ओळखून अन्य पिके असो की, फळबागा दोन्ही ठिबक पद्धतीनेच केली जातात, असे शेतीतील यशस्वीतेचे गणित छायाबाई सांगत होत्या. आता छायाबार्इंकडे बघून त्यांची नात अंकितादेखील शेतीत रमली आहे. तिलाही शेतीतच करिअर करायचे आहे. आपल्या शेतीचे हे फलित असल्याचे छायाबाई अभिमानाने सांगतात.
...तर शेती फायद्याची ठरेल
महिलांच्या हाती शेतीचे व्यवहार द्यायला हवे. त्यामुळे शेती निश्चितच फायद्याची ठरेल. हे पटवून देण्यासाठी छायाबार्इंनी महिला बचत गटाचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, महिलांनी छोट्या-छोट्या उद्योगांसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची टक्केवारी ही पुरुषांनी घेतलेल्या कर्जफेडीच्या कितीतरी पट जास्त आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणायलाच नको. संघर्षातून पुढे जाणाराच हिंमतवाण असतो, असे छायाबाई म्हणाल्या.
अन् मोदींनीच पतीला बोलावून घेतले
गुजरातमधील गांधीनगर येथे दोन वर्षापूर्वी एका समारंभात माझा पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांच्या हस्ते सत्कार होणार होता. पुरस्काराच्या वेळी पोलिसांनी मला एकटीलाच व्यासपीठावर सोडले. त्यामुळे मी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. मोदींनी याचे कारण विचारले. माझ्या हाती शेतीचे व्यवहार देणाऱ्या माझ्या पतीला हा पुरस्कार घेण्यासाठी बोलवावे, अशी विनंती मी केली. मोदींनी स्वत: पतीला बोलावले. तो क्षण कायमचा मनावर कोरला गेलाय, असे त्या सांगतात.