टँकरसाठी तहसीलदारांच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:11 AM2019-05-01T01:11:58+5:302019-05-01T01:12:06+5:30
टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
परतूर तालुक्यातील बहुतांश गावांत सध्या पाणी टंचाई आहे. गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा यासाठी अनेक गावांनी तहसील प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. मसला ग्रा.पं. यात समावेश आहे. गावातील शासकीय विहिरी, बोअर आटले आहेत. यामुळे पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. विहिरीवरून आणलेले पाणी गाळयुक्त आणि दूषित असल्याने गावकरी पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊनही प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने संतप्त महिलांनी थेट तहसील कार्यालय गाठून नायब तहसीलदार सुरेखा कुटूरकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी बाटलीत सोबत आणलेले दूषित पाणी तहसीलदारांच्या टेबलावर ठेवले. तुम्ही बाटलीबंद पाणी पिता, आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. दोन दिवसांत गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शांताबाई पाईकराव, सिंधू गिराम, अनूसया राक्षे, मुगाबाई निलेवाड, शारदा गुंजमूर्ती, छबाबाई भदर्गे आदींची उपस्थिती होती.
गैरसोय दूर करणार
टंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणी पुरवठ्यावर प्रशासन सकरात्मक आहे. मसला गावासाठी तातडीने टँकर सुरु करण्यात येणार असल्याचे सुरेखा कुटूरकर यांनी सांगितले.