निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे - बिनवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:55 AM2019-09-23T00:55:26+5:302019-09-23T00:55:46+5:30
निवडणुका निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी दक्षपणे काम करावे. तसेच निवडणुका निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि.प.च्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसेय्यै, निवडणूक निर्णय अधिकारी शशीकांत हदगल, भाऊसाहेब जाधव, प्रदीप कुलकर्णी, गणेश निºहाळी, शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली थोरात, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, निवडणुकीच्या कामासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्त अधिका-यांनी त्यांना दिलेले काम चोखपणे पार पाडावे. सर्व अधिका-यांच्या कामाचा अहवाल विहित नमुन्यात सादर करावा. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्राची पाहाणी करण्यात यावी.
दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आयोगाने निर्देश दिले असून, त्यादृष्टीने सर्व सुविधा दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील खाजगी व शासकीय होर्डिंगवर असलेले बॅनर्स तातडीने हटविण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.