वर्ष उलटूनही काम ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:47 AM2017-12-15T00:47:34+5:302017-12-15T00:47:44+5:30
जालना शहरातील बसस्थानकाच्या कामासाठी एक कोटींचा निधी आला. बसस्थानकाच्या कामाला सुरूवात झाली; पण काम अर्धवटच सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील बसस्थानकाच्या कामासाठी एक कोटींचा निधी आला. बसस्थानकाच्या कामाला सुरूवात झाली; पण काम अर्धवटच सोडण्यात आले. परिसरात वाळू, खडीचे ढिगारे वर्षभरापासून तसेच पडून आहे. वर्ष उलटूनही काम ठप्प असून बसस्थानकाचे बकालपण कायम आहे. मूलभूत सुविधांअभावी प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.
जालना बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात एक कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. २६ डिसेंबर २०१६ रोजी कंत्राटदाराने बसस्थानकाच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र काम अर्धवटच सोडण्यात आले. फर्निचर बसविण्यासाठी जागोजागी खोदून ठेवले आहे. खड्ड्यांमुळे बसस्थानकात धुळीचे लोट आहे. वर्षभरापासून वाळू, खडीचे ढिग बसस्थानक परिसरात पडलेले आहे. त्याचा आता प्रवाशांना ये-जा करताना त्रास होऊ लागला आहे. कोट्यावधीचा निधी आलेला असताना बसस्थानकाचे काम कधी मार्गी लागणार, असा सवाल जालनेकरांकडून केला जात आहे.