आगीत नऊ लाखांचे फर्निचर खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:38 AM2019-03-29T00:38:57+5:302019-03-29T00:39:17+5:30
विकासनगर भागात राहणाऱ्या डॉ.ओमप्रकाश गोधा यांच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शहरातील विकासनगर भागात राहणाऱ्या डॉ.ओमप्रकाश गोधा यांच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे.
डॉ. गोधा यांचे घर व दवाखाना एकाच ठिकाणी आहे. बुधवारी रात्री ते परिवारासह झोपले असता त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीला अचानक आग लागली. आग लागल्याचे परिसरातील रहिवाशांना दिसले. त्यामुळे त्यांनी तात्काळ डॉ. गोधा यांच्या परिवाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाकडी फर्निचरमुळे आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. डॉ. गोधा यांचा परिवार खालच्या खोलीत असल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, लागलेल्या आगीत खरेदी केलेले सर्व नवीन फर्निचर जळून खाक झाले असून, जवळपास नऊ लाखांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर अडीच तासांनी आग आटोक्यात आली.
गोधा यांनी घराच्या दुस-या मजल्याचे बांधकाम पूर्ण केले होते. त्याची ६ एप्रिल रोजी वास्तुशांती होती. त्यामुळे गोधा यांनी मुंबई येथून फर्निचर मागवले होते. मात्र रात्रीच्या आगीत ते पूर्ण जळून खाक झाले आहे.