मल्लांचे शहर आता सर्व खेळांसाठी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:28 AM2018-02-11T00:28:28+5:302018-02-11T00:29:00+5:30
एके काळी मल्लांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची ओळख आता फुटबॉल, बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, क्रिकेटपटूंचे शहर म्हणून होते आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या शहराने व जिल्ह्याने दिले आहेत.
राजेश भिसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
एके काळी मल्लांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची ओळख आता फुटबॉल, बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, क्रिकेटपटूंचे शहर म्हणून होते आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या शहराने व जिल्ह्याने दिले आहेत. त्यातच फुटबॉलसह इतर विविध खेळांमुळे नवीन पिढीसाठी वातावरण पोषक होत आहे, ही समाधानाची बाब मानली पाहिजे.
व्यायाम, विविध प्रकारचे खेळ निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असतात. आखाडा आणि तालमींसाठी जालना हे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होते. शहरात दादूराम वस्ताद, भोप्या वस्ताद भगत आखाडा, कैलास तालीम, देवाप्पा वस्ताद तालीम, विजय हनुमान तालीम इ. मल्ल व कुस्तीपटूंसाठी प्रसिद्ध होत्या. मराठावाडा, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा या शहरात घेण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र केसरी, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा घेऊन राज्यातील प्रसिद्ध मल्लांनी सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धांमुळे तरुणांना व्यायाम आणि क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. कुस्तीसाठी कोल्हापूरनंतर जालना शहराचे नाव घेतले जात असे. याबरोबरच शरीर सौष्ठव, बुद्धिबळ, फुटबॉल, विटी-दांडू, खो-खो, कबड्डीपटूही या शहरात घडले आहेत. विविध क्रीडा स्पर्धा शहरात घेऊन नवीन खेळाडू तयार व्हावेत, यासाठी माजी आ. कैलास गोरंट्याल, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, स्व. अंकुशराव टोपे, आ. राजेश टोपे, रमेश शेळके, जे. एस. कीर्तीशाही, विवेक निर्मळ, डॉ. दयानंद भक्त, राजेश राऊत, फेरोज अली, हरेष तलरेजा, राजू काणे, बाळासाहेब देशमुख, प्रशांत नवगिरे आदींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.
डॉ. दयानंद भक्त यांनी गतवर्षीच राज्यस्तरीय ११ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा घेऊन स्थानिक मुलांना संधी मिळवून दिली. आगामी काळात ९ वर्षांखालील वयोगटासाठीही राज्यस्तरीय स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय विटीदांडू स्पर्धा काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. या स्पर्धेमुळे केवळ ग्रामीण भागाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाकडे शहरी तरुणांनी लक्षणीय सहभाग नोंदवला आहे.
सध्या शहरासह जिल्ह्यात फुटबॉल फिवर तरुणाईमध्ये दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धांसाठी ज्युनिअर आणि सबज्युनिअर संघ नांदेड व पनवेल येथे रवाना झाला आहे. क्रीडापटू घडविण्याच्या दिशेने पावले उचलली जात असली तरी त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. फुटबॉल, क्रिकेट या खेळांसाठी मैदान उपलब्ध नाही.
राज्य वा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत सहभाग घेण्यासाठी त्याच दर्जाचे साहित्य आणि सुविधा असणे गरजेचे आहे. या मिळाल्या तरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू या शहरात घडू शकणार आहेत. विविध क्रीडा संघटनांचा पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधी व सजग नागरिकांचे सामूहिक प्रयत्न झाले तरच क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण होऊ शकणार आहे. ते होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.