यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:08 AM2019-12-11T01:08:27+5:302019-12-11T01:08:47+5:30
परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संपूर्ण पावसाळा संपल्यावरही पावसाने जिल्ह्याची सरासरी गाठली नव्हती. परंतु परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे. या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. असे असले तरी यंदा पाणी टंचाई पूर्वीप्रमाणे तीव्र होणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
गेल्या वर्षी पाणी टंचाईने हैराण असलेल्या जालनेकरांना यंदा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी टँकरची संख्या ही ५०० पेक्षा अधिक झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन त्रस्त झाले होते. कोट्यवधी रूपये टँकरचे बिल देण्यावर शासनाचा खर्च झाला आहे. ही टंचाई जाणवू नये म्हणून गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली होती. परंतु या योजनेचाही पाहिजे तेवढा परिणाम झाला नाही. ही कामे करताना अनेकवेळा निकष बदलले गेल्याने देखील कामांमध्ये दर्जा राहिला नसल्याचे चित्र आहे.
जालना जिल्हा हा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पक्के स्त्रोत येथे नसल्याने दिवाळी नंतरच पाणी टंचाईच्या झळा येथे सुरू होतात. यंदा दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाचा मोठा दिलासा टंचाई निवारण्यासाठी मिळाल्याने प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
जालना येथील भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हयातील पाणी टंचाईचा आढावा हा जिल्ह्यातील ११० विहिरींमधील पाणी पातळीचा अभ्यास करून घेतला. त्यात यंदा जवळपास सर्वच विहिरींची पाणीपातळी एक मीटरने वाढली आहे.
अपवाद केवळ जालना, बदनापूर तसेच मंठा तालुक्यातील काही विहिरींचा देता येईल. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ ही खऱ्या अर्थाने मार्च ते जून या कालावधीत जाणवू शकते आणि ती देखील केवळ ५८ गावांमध्ये ही टंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अहवाल जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.