यंदा हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांनी मराठवाड्याकडे फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:17 PM2020-11-14T17:17:32+5:302020-11-14T17:19:27+5:30
स्थानिक आणि स्थानिक हिवाळी स्थलांतर करणारे पाण पक्षी मोठेपाण कावळे आणि छोटे पाण कावळे मोठ्या प्रमाणात दिसून आले.
जालना : प्रत्येक हिवाळ्यात मराठवाड्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा मराठवाड्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र पक्षी सप्ताहात पक्षीमित्रांनी केलेल्या निरीक्षणात समोर आल्याची माहिती पक्षी अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली. जालन्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर व पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन १२ नोव्हेंबर या कालावधीत राज्य शासनाने पक्षी सप्ताह जाहीर केला आहे. यानिमित्त महाराष्ट्र वन्यजीव संवर्धन आणि संशोधन संस्था परभणी व महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्य, येलदरी येथील धरण परिसर, जिंतूर येथील मैनापुरी तलाव, चारठाण जवळील रायखेडा, जालना येथील संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी, मोतीतलाव, दरेगाव राखीव वनक्षेत्र परिसर, जामवाडी तलाव, कुंभेफळ तलाव, रेवगाव तलाव आदी ठिकाणी पाणथळ पक्ष्यांचे निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये स्थानिक पक्ष्यांच्या जवळपास दिडशेपेक्षा जास्त प्रजाती आढळून आल्या. त्याची इ-बर्ड या जागतिक संकेत स्थळावर नोंदी घेण्यात आल्या.
या पक्षी सप्ताहमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्यकर्ते, महाराष्ट्र वन्यजीव संवर्धन आणि संशोधन संस्था परभणी यांनी सहभाग नोंदविला. यात अंनिसचे प्रधान सचिव व पर्यावरण अभ्यासक मधुकर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष व पक्षीमित्र वन्यजीव छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम, जल संवर्धन समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष मनोहर सरोदे, नारायण माहोरे, संजय हेरकर, निकिता आबट, सोनाली शेख, अनिता माहोरे, जयंत शेळके, सुमित गायकवाड, करण उघडे, संदीप शिंदे, डॉ. विजय ढाकणे, डॉ. कान्हाडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, अनिल उरटवाड, पुष्पराज मांडवगडे, गणेश कुरा, माणिक पुरी आदींनी सहभाग नोंदविला.
या पक्ष्यांचे झाले निरीक्षण
स्थानिक आणि स्थानिक हिवाळी स्थलांतर करणारे पाण पक्षी मोठेपाण कावळे आणि छोटे पाण कावळे मोठ्या प्रमाणात दिसून आले. मध्यम बगळा, मोठा बगळा, राखी बगळा, जांभळा बगळा, रात बगळा किंवा रात ढोकरी. वंचक किंवा ढोकरी, गाय बगळा, उघड्या चोचीचा करकोचा, रंगित करकोचा, कांडेसर ,पांढरा शराटी किंवा पांढरा कंकर, काळा शराटी, हळदी कुंकू बदक, काणूक बदक आदी विविध प्रकारचे पक्षी आढळून आले.