पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:10 AM2019-09-07T01:10:56+5:302019-09-07T01:11:14+5:30
फिट इंडिया मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिट इंडिया मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी एक हजार पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी क्रीडा दिनाचे औचित्य साधून फिट इंडियाचा संकल्प केला आहे. तो स्तुत्य असून, सर्वांनी व्यायाम व आरोग्याकडे लक्ष दिल्यास मोदींच्या स्वप्नातील फिट इंडिया प्रत्यक्षात उतरेल असे, डॉ. कैलास सचदेव यांनी सांगितले.
येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात फिट इंडिया अंतर्गत योग शिक्षक डॉ. सचदेव यांच्या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले हाते. पुढे बोलतांना सचदेव यांनी सांगितले की, व्यायाम म्हणजे जोर बैठका काढणे नव्हे, व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. या योग साधनेतील आसनांमुळे विविध प्रकारच्या गंभीर व्याधी दूर होतात. प्राणायाम केल्याने तुमचे स्वास्थ्य आणि मनदेखील प्रफुल्लित राहाते. आपण तर पोलीस दलात राहणार आहात, त्यामुळे पोलिसांनी तर आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यांना भविष्यात आरोग्यासोबतच जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारीही सांभाळावी लागते. त्यासाठी पोलिसांचे आरोग्य हे उत्तम राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मोदींच्या पुढाकारानेच २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगाने मान्य केल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एन.डी. चव्हाण यांनी उद्घाटन केले. यावेळी अॅड. महेश धन्नवात, प्राचार्य चव्हाण यांनी देखील डॉ. केलास सचदेव यांच्या बद्दल आपण ऐकून होतो, ते विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून आरोग्यासाठीची मोठी जनजागृती करत असून, ते विविध मॅरथॉनचे ब्रँड अॅम्बेसेडर असल्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी अॅड. धन्नावत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.