कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:48 AM2020-02-11T00:48:21+5:302020-02-11T00:48:55+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला १ हजार २५० कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात प्रारंभी पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा तिसरा हप्ता मिळाला नाही, अशा जवळपास १ लाख ३० हजार शेतक-यांचे खातेक्रमांक, आयएफसी कोड जुळत नसल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी ज्या शेतक-यांच्या या अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी त्या त्या गावात जाऊन १५ दिवसांत हा प्रश्न निकाली काढावा असे निर्देश टोपे यांनी दिले.
यासह वादळी वारे आणि गारपीट तसेच अवकाळी पाऊस यामुळे देखील शेतक-यांचे गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्याला ४८० कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यातील केवळ ५१ कोटी रुपये येणे अद्याप शिल्लक आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत १ लाख ९० हजार शेतक-यांपैकी केवळ २ हजार शेतक-यांचे आधारलिंक अपडेट करणे शिल्लक आहे. तेदेखील आठवड्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा सहकार उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, बाळासाहेब वाकुळणीकर यांच्यासह तहसीलदार, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
बैठक : अधिका-यांनी आळस झटकावा
शासन पातळीवरुन सर्व ती मदत शेतक-यांसाठी केली जात आहे. असे असले तरी प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी पाहिजे त्या तत्परतेने काम करत नसल्याचे दिसून आले. अधिका-यांनी आळस झटकून काम करावे नसता कामे न करणाºयांची स्वतंत्र यादी बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.