साबड्यातून विहिरीत पडल्याने तरुण शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:37 AM2019-03-10T00:37:07+5:302019-03-10T00:37:26+5:30
स्वत:च्या नवीन विहिरीचे काम सुरू असताना ते पाहण्यासाठी गेला असता एका तरुण शेतकऱ्यांचा साबड्यातून तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : स्वत:च्या नवीन विहिरीचे काम सुरू असताना ते पाहण्यासाठी गेला असता एका तरुण शेतकऱ्यांचा साबड्यातून तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे शनिवारी दुपारी घडली.
अकोलादेव येथील तरुण शेतकरी शरद देवराव सवडे (३५) यांच्या शेतात स्वत:च्या विहिरीचे काम चालू होते. विहिरीतील कामाचे माप घेण्यासाठी ते शनिवारी विहिरीत उतरले.
नंतर साबड्यात बसून विहिरीतून वर येताना अचानक तोल गेल्याने ते कोसळले. यावेळी तेथील कामगारांनी त्यांना त्वरित विहिरीतून बाहेर काढून टेंभुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सावंत यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.