गाव झकास, दारूने तरुण पिढी भकास..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:41 AM2018-11-20T00:41:14+5:302018-11-20T00:41:51+5:30
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ गावामध्ये खुलेआमपणे अवैधरीत्या देशी दारुविक्री होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ गावामध्ये खुलेआमपणे अवैधरीत्या देशी दारुविक्री होत आहे त्यामुळे गाव झकास पण देशी दारुमुळे तरुणपिढी भकास अशी ओळख आता परिसरात गावाची होत आहे.
जळगाव सपकाळ हे गाव परिसरात गावाला पूर्वीपासून वारकरी सांप्रदायाचा भाग म्हणून ओळख होती, गावातील सर्व जाती - धमार्तील ग्रामस्त एकोप्याने व गुण्या गोविंदाने राहत असे त्यामुळे गावाचा चेहरा म्हणून वारकरी सांप्रदाय असल्याने गाव झकास होते. परंतु कालांतराने तरुणपिढी व्यसनाकडे वळत असल्याच्या कारणाने गावातील नागरिकांनी ग्रामसभेव्दारे चार वर्षात तीनवेळा दारुबंदीचा ठराव घेऊन संमत करण्यात आला व गावातील अवैध दारुबंदीसाठी काही महिन्या पूर्वी हद्दपार झाली होती, माञ आता पारध पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही दारू विक्री सुरू आहे. दारुबंदीचा ठराव घेतलेल्या गावांमध्येही जोरात अवैध दारुविक्री सुरु असून, याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी गावातील महिलांनी पारध पोलीसासह जिल्हाधिका-यांकडे नऊ जानेवारीला केली होती. मात्र प्रशासनाने कारवाई न केल्याने गावांमध्ये अवैधरीत्या दारुचीविक्री सुरुच आहे.
शासनाचा निर्णय व ग्रामपंचायतीचा दारुबंदीचा ठराव घेतल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर उपाययोजनेची जबाबदारी प्रशासन व पोलीस विभागाची आहे. माञ पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
संबंधित गावातील अवैध दारूची दुकाने ही गावातील फाट्यावर, शाळा परिसरात रस्त्याच्या कडेला चालू आहेत. एकूणच दारूबंदीसाठी पोलीस आणि जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असले तरी, उत्पादन शुल्क विभागा कडे ग्रामपंचायतचा ठराव देऊन मतदान करण्याची मागणी करणे गरजेचे आहे. हे मतदान झाल्यावरच गावात दारू बंदी अंमलात येऊ शकते असे पोलिसांनी सांगितले. मात्र तसेच होत नसल्याने पोलिसांकडून अपेक्षा करणे चुकीचे असल्याचेही सांगण्यात आले.