गावाकडे आलेला तरुण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:50 AM2018-01-24T00:50:02+5:302018-01-24T00:50:21+5:30
आजोबांच्या दहाव्यासाठी गावी आलेला तरुण जोगलादेवी बंधा-यात बुडाला आहे. मंगळवारी दिवसभर शोधकार्य करूनही पोलीस व अग्निशमन दलाच्या हाती काहीच लागले नाही.
तीर्थपुरी : आजोबांच्या दहाव्यासाठी गावी आलेला तरुण जोगलादेवी बंधा-यात बुडाला आहे. मंगळवारी दिवसभर शोधकार्य करूनही पोलीस व अग्निशमन दलाच्या हाती काहीच लागले नाही. रात्री उशिरापर्यंत पाणबुडीच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.
संतोष लक्ष्मण खोजे (३१, रा. जोगलादेवी) असे या तरुणाचे नाव आहे. संतोष सध्या आळंदी येथे नोकरीनिमित्त कुटुंबियांसोबत राहत होता. आजोबा ज्ञानदेव खोजे यांचे १५ जानेवारीला निधन झाल्यामुळे तो दहाव्याच्या कार्यक्रमासाठी २१ जानेवारीला गावाकडे आला होता. सोमवारी रात्री घरी इतरही पाहुणे आलेले होते. संतोषच्या आईने त्यास पाहुण्यांसोबत जेवून घेण्याचे सांगितले. मात्र लघुशंकेला जाऊन येतो म्हणून तो चप्पल घालून घराबाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी नातेवाइकांनी संतोषचा सर्वत्र शोध सुरू केला. गावालगत असलेल्या जोगलादेवी बंधा-यावर त्याच्या चपला आढळून आल्या. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी तीर्थपुरी पोलीस चौकीत माहिती दिली. माहिती मिळताच कॉन्स्टेबल बी.के. हवाले, बी. व्ही. शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ समर्थ कारखान्याचे अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी बोलावले. अग्निशामक दलाचे एफ. आर. बुनगे यांनी जवानांच्या मदतीने बारा हजार लिटर पाणी अतिउच्च दाबाने पाईपच्या मदतीने बंधाºयात सोडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू वर आली. मात्र, संतोषचा शोध लागला नाही. बंधा-यावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा परतूर येथून आलेल्या पाणबोटीच्या मदतीने जोगलादेवी बंधा-यात शोधकार्य सुरू होते.